मिरज पूर्वमध्ये पानमळे नामशेष होणार

By Admin | Updated: September 4, 2015 22:09 IST2015-09-04T22:09:24+5:302015-09-04T22:09:24+5:30

पानाला कवडीमोल किंमत : खुडेकऱ्यांची मजुरीही परवडेना; पानमळ्यांवर कुऱ्हाड

Parmal will be extinct in the east of Miraj | मिरज पूर्वमध्ये पानमळे नामशेष होणार

मिरज पूर्वमध्ये पानमळे नामशेष होणार

दिलीप कुंभार -नरवाड---मिरज पूर्व भागातील पान उत्पादकांच्या पानांना बाजारपेठेत कवडीमोल किंमत मिळत असल्याने, अखेर पानवेलीच काढून टाकण्याचा निर्णय अनेक पान उत्पादकांनी घेतला आहे. नीचांकी दराने पाठ सोडली नसल्याने, अखेर ज्या हाताने पानवेलीला पाणी देऊन जतन केले, त्याच हातांनी नाईलाजास्तव कुऱ्हाड चालवावी लागत असल्याचे विदारक चित्र मिरज पूर्वभागातून दिसू लागले आहे.-मिरज पूर्वभागात पानमळे मोठ्या प्रमाणावर आहेत. पान उत्पादकांना १८ वाफ्यांचा एक गुंठा पानमळा तयार करण्यासाठी २५२ पानवेली लागतात. एका वाफ्यात १४ पानवेलींची लागण करतात. ४० आर क्षेत्रासाठी १० हजार ८० पानवेली लागतात. पानवेलीच्या बिया म्हणून साडेसात कांड्याचे खोडाकडील कलम वापरतात. एका कलमाची किंमत सात रुपये असते. एक एकर क्षेत्रावर पानवेलींची लागण करण्यासाठी ७० हजार ५६० रुपये इतका खर्च येतो.याशिवाय ठिबक सिंचन सेटसाठी ५५ हजार रुपये, शेवगा, शेवरी, पानमळ्याला तटबंदी आदींचा खर्च २५ हजार रुपये येतो. एक एकर पानमळा घालून उत्पादन सुरू करण्यासाठी एक लाख ४० हजार ५६० रुपये खर्च येतो. एवढी प्रचंड गुंतवणूक करूनही पानांना पान बाजारपेठेत हमीभाव मिळत नसल्याने उत्पादक चिंतातूर झाले आहेत. पानांचा दर घसरल्याने पान मळ्यातील वेल बांधणे आणि खुडा करणे पान उत्पादकांना परवडत नसल्याने पदरमोड करावी लागत आहे. याबाबत जाधव यांनी सांगितले की, पान मळ्यातील कामगारांचा खर्च निघत नसल्याने पानमळा तोडण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही.

दर मिळत नसल्याने हंगाम परवडेना
एकेकाळी मिरज पूर्वभागाचे वैभव, अशी या भागातील पानमळ्यांची ओळख होती. देशभरात येथील पान निर्यात होत होते. मात्र गेल्या काही वर्षात वाढती शेतमजुरी, अवास्तव शेणखतांचे दर आणि भरपूर लागणारे पाणी यातून सध्या तरी पानांच्या मिळणाऱ्या भावात सावरणे अशक्य असल्याचेही मत येथील पानमळे बागायतदार काकासाहेब जाधव यांनी व्यक्त केले. भविष्यात पानवेलींच्या पानांच्या दराची अशीच घसरण कायम राहिल्यास पानमळा शेतीच नामशेष होण्याची भीती परिसरातील पान उत्पादक बागायतदांतून व्यक्त होत आहे. उत्पादकांचा जून ते डिसेंबर हा पाने खुडण्याचा हंगाम असतो, पण यावर्षी हंगाम सुरू होऊन सप्टेंबर महिना उजाडला तरी पानांना दर मिळत नसल्याने, मळ्यांवर कुऱ्हाड चालविणे उत्पादकांना भाग पडत आहे. गेल्या दहा वर्षांपासून प्रथमच पानांच्या दराने नीचांकी पातळी गाठली आहे. सांगोला, पंढरपूर, उस्मानाबाद, पुणे, रत्नागिरी, मुंबई, कलकत्ता, बनारस, राजकोट (गुजरात) आदी प्रमुख पान बाजारपेठेत मंदीचे सावट कायम आहे. यामुळे नरवाड (ता. मिरज) येथील काकासाहेब जाधव यांनी दराची वाट पाहून स्वत:च आजवर जपलेल्या आपल्या पानमळ्याला कुऱ्हाड लावली आहे.

Web Title: Parmal will be extinct in the east of Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.