पालकांनीच बंद केली कुरणे वस्ती शाळा!
By Admin | Updated: September 9, 2014 23:47 IST2014-09-09T23:17:45+5:302014-09-09T23:47:35+5:30
सिद्धेवाडीतील प्रकार : विरोध डावलून वादग्रस्त शिक्षकाची नियुक्ती

पालकांनीच बंद केली कुरणे वस्ती शाळा!
मिरज : सिध्देवाडी (ता. मिरज) येथील कुरणे वस्ती शाळेसाठी जि. प. प्रशासनाने पालकांचा विरोध डावलून वादग्रस्त निलंबित शिक्षकाचीच नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ संतप्त पालकांनी काळ्या फिती लावून शाळा बेमुदत बंद ठेवली आहे. गेल्या शनिवारपासून बंद असलेल्या शाळेकडे गटशिक्षणाधिकारी फिरकले नसल्याने त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणीही पालकांनी केली आहे. दुसरा शिक्षक दिल्याशिवाय शाळा सुरू न करण्यावर पालक ठाम आहेत.
कुरणे वस्ती प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. तत्कालीन शिक्षणाधिकारी पोले यांनी पाचवीचा वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली होती. चौथीपर्यंत दोन शिक्षक आहेत. पाचवीच्या वर्गासाठी गेल्या वर्षभरात नवीन शिक्षक देण्यास टाळाटाळ सुरू आहे. वारंवार मागणी करूनही शिक्षक न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.
जादा शिक्षक नेमणुकीची पालकांची मागणी होती. जि. प. प्रशासनाने सव्वा वर्षाने वादग्रस्त, निलंबित शिक्षक देऊन मागणीची चेष्टा केली असल्याचा पालकांचा आरोप आहे. पालकांनी या शिक्षकाला हजर करून घेण्यास विरोध दर्शवित यापूर्वी शाळेला कुलूप ठोकले होते.
शिक्षण विभागाने दुसरा शिक्षक देण्याचे आश्वासन पाळले नाही. जि. प. प्रशासन व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या निषेधार्थ पालकांनी काळ्या फिती लावून शनिवारपासून शाळा बेमुदत बंद ठेवली आहे. मात्र शाळेकडे शिक्षण विभागाचा एकही अधिकारी न फिरकल्याने पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
दुसरा शिक्षक न दिल्यास शाळा सुरू न करण्याबरोबर पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महावीर खोत, सरपंच शीलाताई कुरणे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब माने, अनिता एडके, पांडुरंग व्हटकर यांनी दिला आहे. (वार्ताहर)
दारू पिऊनच शिक्षक हजर !
कुरणे वस्तीवरील पालकांचा विरोध असतानाही प्रशासनाकडून वादग्रस्त शिक्षकालाच शाळेत हजर राहण्यास पाठविण्यात आले होते. शाळेत हजर होण्यास आलेला शिक्षक दारू ढोसूनच होता. त्याला पाहताच पालक अधिकच संतप्त झाले होते. या शिक्षकाने पालकांचा आक्रमक पवित्रा पाहून शाळेत न जाताच धूम ठोकली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महावीर खोत यांची भेट घेऊन आपण औषध म्हणून दररोज घेतो. , असे या शिक्षकाने सांगितले. अधिकारी अशा शिक्षकाला पाठीशी का घालत आहेत, असा सवाल पालकांतून विचारला जात आहे.