पालक गमावलेल्या बालकांची माहिती देण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST2021-05-23T04:25:40+5:302021-05-23T04:25:40+5:30
सांगली : कोविड आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे. ...

पालक गमावलेल्या बालकांची माहिती देण्याचे आवाहन
सांगली : कोविड आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे. महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना त्याचा तपशील कळवावा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. नागरिकांनादेखील बालकांविषयीची माहिती १०९८ या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर व बाल कल्याण समितीला कळवता येईल.
कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संपूर्ण संरक्षणासाठी जिल्हास्तरावर कृती दल स्थापन करण्यात आले आहे. त्याची बैठक काल झाली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विश्वास माने, उपायुक्त राहुल रोकडे, बाल कल्याण समिती अध्यक्षा सुचेता मलवाडे, शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, बाल संरक्षण अधिकारी बी. टी. नागरगोजे, महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे एस. एच. बेंद्रे आदी उपस्थित होते. पालक गमावलेल्या बालकांना इतर नातेवाईक सांभाळणार असल्यास किंवा बालगृहात दाखल करणे आवश्यक असल्यास त्यानुसार कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.