कवितेतून परतत्त्वाचा अलौकिक अनुभव
By Admin | Updated: December 7, 2015 00:30 IST2015-12-06T23:17:44+5:302015-12-07T00:30:06+5:30
इंद्रजित देशमुख : तडसर येथे सुनंदा शेळके यांचा ‘काव्यरत्न’ पुरस्काराने गौरव

कवितेतून परतत्त्वाचा अलौकिक अनुभव
कडेगाव : कविता ही परतत्त्वाचा अनुभव असणारी असते. असा अनुभव देणाऱ्या कवी पांडुरंग माळी गुरुजींचा काव्याचा वारसा पुढे सुरू राहावा, यासाठीच ‘काव्यरत्न’ पुरस्कार पुत्राने सुरू करून त्यांचे जिवंत स्मारक उभे केले आहे. ही बाब कौतुकास्पद व साहित्यिकांना प्रेरणा देणारी ठरणार आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.
तडसर (ता. कडेगाव) येथे मराठी साहित्य परिषद (कडेगाव-खानापूर) व कवी पांडुरंग माळी यांच्या कुटुंबियांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कवयित्री प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांना ‘कवी पांडुरंग माळी काव्यरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी इंद्रजित देशमुख म्हणाले की, माणूस आयुष्यात कसा जगला, हे महत्त्वाचे असते. माणूस जिगरबाज, कर्तबगार असला तरच पुढची पिढीही संस्कारसंपन्न बनते. आज समाजामध्ये मानसिकता बदललेली आहे. याला सर्वस्वी आजची बदललेली सामाजिक परिस्थितीच जबाबदार आहे. समाजामध्ये सामाजिक बदल घडविण्याचे काम साहित्यिकच करत असतात. साहित्यिकाचे जगणे अनुभवनिष्ठ असते. जी माणसे कर्तबगार व विनम्र असतात, अशीच माणसे साहित्यिक व कलावंत असतात. शब्दांशी खेळणारा कवी आपल्या काव्यातच आनंद शोधतो. अशापैकी एक कवी पांडुरंग माळी यांचे स्मारक पुरस्काररूपाने अनेक नवकवींना आत्मबळ देणारे ठरणार आहे.
डॉ. सुनंदा शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. सदानंद माळी यांनी स्वागत, तर प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. मन्सूर जमादार यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी अॅड. सुभाष पाटील, सुु. धों. मोहिते, अॅड. सतीश लोखंडे, त्रिलोकनाथ जोशी, रघुराज मेटकरी, दत्ता सपकाळ, शाहू पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शांतिनाथ मांगले यांनी सूत्रसंचालन केले. आकाश पाटील (सरगर) यांनी आभार मानले. (वार्ताहर)