पैरा फेडाफेडीत विकास आघाडी अस्वस्थ

By Admin | Updated: July 22, 2016 00:03 IST2016-07-21T23:42:26+5:302016-07-22T00:03:21+5:30

वाळवा-शिराळ्यातील चित्र : स्वाभिमानी संघटनेचा मात्र पांग फिटला

Paragraph Fandafide Development Ahead Unrest | पैरा फेडाफेडीत विकास आघाडी अस्वस्थ

पैरा फेडाफेडीत विकास आघाडी अस्वस्थ

अशोक पाटील -- इस्लामपूर --लोकसभा, विधानसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाळवा-शिराळा तालुक्यात जयंत पाटील यांनाच विरोधकांनी लक्ष्य केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, आ. शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांच्यासह काही काँग्रेसचे नेते एकमेकांचा पैरा फेडून राजकीय मशागत करतात. त्यातूनच स्वाभिमानी संघटनेला सत्तेत स्थान मिळाले आहे. मात्र आ. नाईक यांचे मंत्रीपद हुकल्याने विकास आघाडी अस्वस्थ आहे.
गेल्या दहा वर्षांत जयंत पाटील हेच विरोधक मानून आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील, वैभव नायकवडी, जितेंद्र पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या विरोधात असलेले छोटे-मोठे गट आणि ऊस उत्पादक खासदार राजू शेट्टी यांच्या पाठीशी राहिले आहेत. याचा फायदाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला झाला आहे. सलग दोनवेळा लोकसभा निवडणुकीत शेट्टी विजयी झाले आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी मोदी लाटेचा पुरेपूर फायदा उठवला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांचा पैरा फेडण्यासाठी विधानसभा निवडणुकीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मदतीचा हात देतात. त्यानुसार आमदार शिवाजीराव नाईक यांच्या विकास आघाडीच्या प्रचार दौऱ्यात अग्रस्थानी राहून त्यांनी पैरा फेडला आहे.
विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत गेली. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांनी भाजपात प्रवेश करुन निवडणूक लढवली. याचवेळी त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार, अशी हवा होती. मात्र भाजपने घटकपक्षांना न्याय देण्याचे धोरण निश्चित केल्याने ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ खोत यांना आमदारकीपाठोपाठ मंत्रीपदही देण्यात आले. त्यामुळे विकास आघाडीचे नेते अस्वस्थ आहेत. नाईलाजास्तवच खोत यांचा सत्कार घेऊन, आपण एक आहोत, असे ते भासवत आहेत.
एकेकाळी ‘स्वाभिमानी’ला मतदान केंद्रावर प्रतिनिधी मिळत नव्हता. आता एक खासदार आणि एक मंत्रीपद मिळाल्यानंतरही वाळवा-शिराळ्यात कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार झालेली नाही. असे असले तरी वाळवा-शिराळ्यात भाजपपेक्षा ‘स्वाभिमानी’ची ताकद वाढली आहे.

गेली दहा वर्षे राष्ट्रवादीविरोधात विकास आघाडी काम करत आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही सर्व पक्षांना एकत्र घेऊन विकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविणार आहे. घटकपक्षाला न्याय देण्याच्या भाजपच्या भूमिकेमुळेच सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यात आम्हालाही आनंद आहे.
- राहुल महाडिक,
माजी जिल्हा परिषद सदस्य

Web Title: Paragraph Fandafide Development Ahead Unrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.