इस्लामपुरातील पेपर विक्रेते निघाले बँकॉक दौऱ्यावर..!
By Admin | Updated: June 13, 2015 00:12 IST2015-06-12T23:53:56+5:302015-06-13T00:12:57+5:30
राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद : ‘कलाक्षेत्रम्’च्या युवा कलाकारांची आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड

इस्लामपुरातील पेपर विक्रेते निघाले बँकॉक दौऱ्यावर..!
इस्लामपूर : इस्लामपूर शहरात उपजीविकेसाठी वृत्तपत्र विक्री करणाऱ्या तिघा युवकांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत विजेतेपद पटकावत बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी आगेकूच केली आहे. आधुनिक नृत्यशैलीचा आविष्कार दाखवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्या युवकांच्या या जिद्दीला शहरवासीयांनी सलाम केला आहे.
अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्यावतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत इस्लामपूरच्या कलाक्षेत्रम् नृत्य अकादमीच्या कलाकारांनी ‘गणेशस्तुती’ या नृत्याचे सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. आबीद मुजावर, नितीश पवार, एलिंगा पुजारी या इस्लामपूरच्या वृत्तपत्र विक्रेत्यांसह अमित बनसोडे, आकाश बनसोडे, अक्षय बनसोडे, अण्णा वाघमारे, रोहित कांबळे, महेश कांबळे (सर्व पलूस), क्षीतिज भिसे (कार्वे), आशिष पवार (विटा) हे सहकलाकार आंतरराष्ट्रीय शिखर पादाक्रांत करण्यासाठी बँकॉकला जाण्याच्या तयारीत आहेत.
पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत देशभरातील २0 राज्यांतील सहा हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या मोठ्या सहभागाच्या स्पर्धेतून इस्लामपूरच्या कलाक्षेत्रम् नृत्य अकादमीने नृत्यशैलीच्या अदाकारीवर प्रथम क्रमांक पटकावला. या विजेत्यांना प्रसिध्द संगीतकार सुरेश तळवळकर यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व चषक देऊन गौरविण्यात आले. नृत्य शिक्षक वसंत हंकारे, शशिकांत राडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कलाकारांनी हे यश मिळवले.
इस्लामपूरसारख्या निमशहरी भागातील कलाकारांना नृत्याचे धडे देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याची संधी मिळते, हे नृत्य शिक्षक हंकारे व राडे यांच्या मार्गदर्शनाने सिध्द झाले आहे. त्यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. (वार्ताहर)
आर्थिक मदतीचे आवाहन
शहरातील कलाक्षेत्रम् नृत्य अकादमीत नृत्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या कलाकारांना त्यांच्या जिद्दीच्या जोरावर परदेशवारी करण्याची संधी मिळाली आहे. हे यश मिळविणाऱ्या सर्वच कलाकारांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. शिक्षण घेताना पडेल ते काम करून उपजीविका चालवणाऱ्या या कलाकारांना बँकॉक येथील स्पर्धेला जाण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. इस्लामपूरचे नाव सातासमुद्रापार नेणाऱ्या या युवा कलाकारांना शहरातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.