पेपर फुटीप्रकरणी आरोग्य सेविकाबडतर्फ

By Admin | Updated: November 27, 2015 00:41 IST2015-11-26T23:37:06+5:302015-11-27T00:41:48+5:30

एक निलंबित : फेरपरीक्षा घेण्याचा स्थायी समितीचा ठराव; दोघींवर कॉपीचा गुन्हा

Paper Footwear Case Career | पेपर फुटीप्रकरणी आरोग्य सेविकाबडतर्फ

पेपर फुटीप्रकरणी आरोग्य सेविकाबडतर्फ

सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर शेटफळे आरोग्य उपकेंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका शाहीन अजमुद्दीन जमादार (रा. करगणी, ता़ आटपाडी) हिला बडतर्फ करण्यात आले, तर तिला मदत करणारी नियमित आरोग्य सेविका शकिरा उमराणीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करण्यात येत असून आणखी काही नावे उजेडात येण्याची चिन्हे आहेत.
आरोग्य सेवक (महिला) या पदासाठीच्या लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार बुधवारी दुपारी परीक्षेदरम्यान उघडकीस आला़ याप्रकरणी दोन आरोग्य सेविकांविरुद्ध जिल्हा परिषद प्रशासनाने सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या दोन आरोग्य सेविकांवर तातडीने कारवाई केली.
पेपर फुटीबद्दल निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांसाठी बुधवारपासून लेखी परीक्षा सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठी परीक्षा होती़ आरोग्य सेवक (महिला) पदाच्या ३८ जागांसाठी ९१५ उमेदवार होते़ दुपारी दोन वाजता आरोग्य सेवक (महिला) या पदासाठी लेखी परीक्षा होती़ ग़ रा़ पुरोहित कन्या प्रशालेतील वर्ग क्रमांक आठ येथे पर्यवेक्षक कांतिनाथ जोशी यांनी प्रश्नपत्रिका देण्यापूर्वी उमेदवारांना उत्तरपत्रिका दिली़ या वर्गातील शाहीन अजमुद्दीन जमादार (रा. करगणी, ता़ आटपाडी) या उमेदवाराने प्रश्नपत्रिका हातात पडण्यापूर्वीच उत्तरे लिहिण्यास सुरुवात केली़ वर्गातील शेजारच्या उमेदवारांना त्याबाबत शंका आली़ प्रश्नपत्रिकेपूर्वीच उत्तरपत्रिका लिहिली जात असल्याबाबत त्यांनी पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिले़ काही वेळाने वर्गातील सर्व उमेदवारांना प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यानंतर सर्व उमेदवारांनी उत्तरे लिहिण्यास सुरुवात केली़ पर्यवेक्षकाने जाब विचारल्यानंतर शाहीनने बाथरुमला जाण्याचा बहाणा केला़ बाथरुमला गेल्यानंतर ती पायजमा बदलून आली़ कपडे बदलल्यानंतरही तिच्या पायजम्यावर उत्तरे लिहिली असल्याचे निदर्शनास आले़ केंद्र प्रमुखांनी शाहीनची चौकशी केल्यानंतर तिची बोबडी वळाली़ प्रश्नपत्रिका मिळण्यापूर्वीच शाहीनने अर्ध्याहून अधिक उत्तरे लिहिली होती़ (प्रतिनिधी)

सूत्रधार कोण? : आणखी कोणाचा हात?
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानंतर सखोल चौकशी केली जात आहे. प्रश्नपत्रिकेपूर्वीच उत्तरपत्रिका लिहिली गेल्याने पेपर फोडण्यामागे शासकीय यंत्रणेतील आणखी काहींचा हात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण?, याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे.

सदस्यांची मागणी
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत बुधवारी पेपर फुटीवरून जोरदार चर्चा झाली. सदस्यांनी या पदाची फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार सर्वानुमते आरोग्य सेविकेच्या ३८ जागांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार आता प्रशासकीय पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.


अशी आहे गुणांची यादी...
पदजागाअर्जपरीक्षा दिलेलेउत्तीर्ण
औषध निर्माण अधिकारी३४४५३७0१0८
आरोग्य सेविका ३८९१५७३३१९९
आरोग्य सेवक८४६५२८९३५


यादी जाहीर...
नियमानुसार बुधवारी झालेल्या परीक्षेच्या गुणांची यादी जिल्हा परिषदेत लावण्यात आली. पेपर फुटीमुळे चर्चेत असलेल्या आरोग्य सेविका पदाच्या परीक्षेचा निकाल २७ टक्के इतकाच लागला आहे. ३८ जागांसाठी एकूण ९१५ उमेदवारांनी अर्ज भरला होता. यापैकी ७३३ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यातील १९९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


पोलिसांकडून दोघींची कसून चौकशी
शाहिन जमादार व तिला मदत करणारी शकिरा उमराणी या दोघींवर परीक्षेला कॉपी केल्याचा गुन्हा शहर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघींनाही अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. केंद्र प्रमुखांकडे कोणतीच तक्रार न आल्याने, त्यांनी पोलिसांत कॉपी केल्याची फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्या तरी कॉपीची तक्रार दाखल असून त्या दोघींना अटक केली आहे. आता पेपर कसा फुटला, याची चौकशी तपासात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Paper Footwear Case Career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.