निकृष्ट रस्त्यांचा उद्योजकांकडून पंचनामा
By Admin | Updated: November 28, 2015 00:17 IST2015-11-27T23:45:51+5:302015-11-28T00:17:40+5:30
अधिकारी धारेवर : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील काम बंद पाडले; उद्योग मंत्र्यांना साकडे घालणार

निकृष्ट रस्त्यांचा उद्योजकांकडून पंचनामा
कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सध्या ठेकेदाराकडून अतिशय घाईगडबडीत व निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याने उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे़ त्या पार्श्वभूमीवर येथील उद्योजकांनी कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन निकृष्ट कामाचा पंचनामा केला़ यावेळी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारालाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यामुळे उद्योजकांनी अधिकाऱ्याला धारेवर धरले़ तसेच पाच तास उद्योजकांनी काम बंद पाडले़
कुपवाड एमआयडीसीमध्ये औद्योगिक विकास महामंडळाकडून सुमारे दहा कोटीचे रस्ते केले जात आहेत़ उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे उद्योजकांनी याबाबत पाठपुरावा केल्यामुळेच हे रस्त्याचे काम मंजूर झाले़ मिरज एमआयडीसीमध्येही रस्त्याची कामे सुरू आहेत़ त्याठिकाणी मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अत्यंत काळजीने ही कामे करून घेत आहे़ त्यामुळे मिरज एमआयडीसीमधील कामाबाबत तेथील उद्योजकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे़
कुपवाड एमआयडीसीमध्ये मात्र संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे़ कुपवाड एमआयडीसीमध्ये पावसाळ्यापूर्वी सुरू झालेले हे रस्ताकाम अद्यापपर्यंत सुरूच आहे़ कामास उशीर झाल्याने सध्या हे काम संबंधित ठेकेदाराकडून घाईगडबडीत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे़ काही ठिकाणी रस्ता उखडू लागला आहे़, तर काही ठिकाणी माती न काढताच त्यावर डांबरीकरण केले जात आहे़ पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईपही टाकल्या गेल्या नाहीत़ त्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीमधील उद्योजकांमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी पसरली़
त्याचा उद्रेक शुक्रवारी झाल्याने उद्योजक डी़ के. चौगुले, मनोज भोसले, जफर खान, चंद्रकांत पाटील, शशिकांत मसुटगे, प्रफुल्ल शिंदे, नेमाणी यांच्यासह इतर उद्योजकांनी कार्यकारी अभियंता प्रमोद शेटके व उपअभियंता एस़ एस़ मलाबादे यांची भेट घेतली़ यावेळी कुपवाड एमआयडीसीमध्ये निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याबद्दल उद्योजकांनी त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर, ठेकेदारास पाठीशी घालण्याचा उद्योग एका अधिकाऱ्याकडून झाल्याने उद्योजकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले़ यावेळी जोरदार वादावादी झाली़
त्यानंतर कार्यकारी अभियंता शेटके यांच्यासह अधिकाऱ्यांना कुपवाड एमआयडीसीमध्ये प्रत्यक्ष कामावर नेऊन निकृष्ट दर्जाचे काम दाखविल्यानंतर त्यांनी ठेकेदाराकडून झालेली चूक मान्य केली़ कार्यकारी अभियंता शेटके यांनी ठेकेदारांना सक्त ताकीद देऊन काम सुधारण्यास सांगितले़़ तसेच काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी क्रॉस पाईप टाकण्याविषयी सूचना दिल्या़ हे सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम एमआयडीसीतील उद्योजकांनी सुमारे पाच तास बंद पाडले होते़
उद्योजकांनी यावेळी ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरल्यानंतरही संबंधित ठेकेदाराने पुन्हा त्याच पध्दतीने काम सुरू केल्यानंतर उद्योजक डी़ के. चौगुले, मनोज भोसले, जफर खान, बामणोलीचे उपसरपंच अंकुश चव्हाण, चंद्रकांत पाटील यांच्यासह उद्योजकांनी उद्योगमंत्री देसाई व मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्याकडे लेखी तक्रार करण्याचे निश्चित केले आहे़
कामाचा दर्जा पाहून कामाचे थर्ड पार्टी आॅडिट करावे़, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उद्योजकांनी निवेदनात दिला आहे़ औद्योगिक क्षेत्रामध्ये सध्या सुरू असलेले डांबरीकरणाचे काम उद्योजकांनी चांगल्याप्रकारे करून घ्यावे़ निकृष्ट असल्यास याबाबत आमच्याकडे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहनही चौगुले, भोसले व खान यांनी केले आहे़ (वार्ताहर)
उद्योजकांची रकमेबाबत फसवणूक़़़़़
औद्योगिक विकास महामंडळाकडून कुपवाड एमआयडीसीमध्ये सुमारे दहा कोटी रूपयांचे रस्ते डांबरीकरणाचे काम केले जात आहे़ मात्र, एमआयडीसीचे अधिकारी आणि ठेकेदारांनी संबंधित रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुमारे पाच कोटी रूपयांचे होत असल्याचे उद्योजकांना सर्वांसमोरच सांगून टाकले़ तसेच बिलो टेंडर घेतले असल्याने सांभाळून घ्या, असेही उद्योजकांना ठेकेदाराने सांगितले़ त्यावेळी उद्योजकांनी, परवडत नसेल तर काम का घेतले? असा सवाल ठेकेदारासमोर उपस्थित केला़ कमी आकडे सांगून उद्योजकांची एकप्रकारे फसवणूक केली जात असल्याचे उद्योजक भोसले यांनी पत्रकारांना सांगितले़
निकृष्ट कामाची अधिकाऱ्यांनी दिली कबुली
रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले असून हा रस्ता खराब होणार आहे. यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई व मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांना निवेदन देणार आहे, अशी माहिती कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स व कुपवाड एमआयडीसीचे माजी उपाध्यक्ष डी. के. चौगुले यांनी दिली.