पतंगराव, जयंतरावांचा तासगावकडे कानाडोळा

By Admin | Updated: November 15, 2016 23:39 IST2016-11-15T23:39:19+5:302016-11-15T23:39:19+5:30

भाजपच्या मतांवर डोळा : नगरपालिका निवडणुकीला सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीची किनार

Pantangrao, Jayantraovaa to Kandalola | पतंगराव, जयंतरावांचा तासगावकडे कानाडोळा

पतंगराव, जयंतरावांचा तासगावकडे कानाडोळा

दत्ता पाटील ल्ल तासगाव
तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने तासगावात रणधुमाळी सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने प्रचाराला सुरुवात केली आहे, तर काँग्रेसची बुधवारपासून सुरुवात होत आहे. मात्र या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीचे पालकत्व असणारे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम यांनी मात्र या रणधुमाळीत तासगावकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. तासगावात भाजपची आणि खासदार संजयकाका गटाची १४ मते आहेत. मतदान दोन दिवसांवर आले तरी, दोन्ही भाजपकडून भूमिका स्पष्ट झालेली नाही. भाजपच्या या मतांवर डोळा ठेवून या दोन्ही नेत्यांनी तूर्तास तासगावकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.
तासगाव नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपकडून खासदार संजयकाका पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून तासगाव शहर पिंजण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून आमदार सुमनताई पाटील आणि स्मिता पाटील यांनी तासगावात ठाण मांडले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनीही शहरातील प्रत्येक मतांवर लक्ष केंद्रित केले आहे. तिरंगी लढतीत शेकाप आणि शिवसेनेसह अन्य अपक्षांनीही चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. अटीतटीने होत असलेल्या या निवडणुकीच्या प्रचाराची यंत्रणा जोमात आहे.
भाजपची सर्वस्वी मदार खासदार पाटील यांच्यावर आहे. त्यांनी शनिवारी प्रचाराला सुरुवात केली. राष्ट्रवादीची मदार आमदार सुमनतार्इंवर असली तरी, आबांच्या पश्चात आमदार जयंत पाटील यांच्याकडे तालुक्याचे पालकत्व आहे. त्यामुळे प्रचाराच्या प्रारंभाला ते येतील, अशी चर्चा होती. मात्र जयंत पाटील यांनी तासगावकडे कानाडोळा केला. काँग्रेसच्या जाहीर प्रचाराचा प्रारंभ बुधवारी होत आहे. तासगावची धुरा महादेव पाटील यांच्याकडे असली तरी, आमदार पतंगराव कदम यांच्याकडून पाटील यांना रसद पुरवण्यात येत होती. मात्र काँग्रेसकडून होणाऱ्या प्रचाराच्या प्रारंभाला पतंगराव कदम उपस्थित राहणार नसल्याची चर्चा आहे.
विधानपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याआधी आमदार कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्याकडून खासदार आणि भाजपवर सातत्याने निशाणा साधला जात होता, तर आमदार जयंत पाटील यांच्याकडून तासगावात राष्ट्रवादीला सत्तेत आणण्यासाठी लक्ष केंद्रित केले होते. मात्र विधानपरिषद निवडणुकीत दोन्ही काँग्रेस आमने-सामने आले आहेत.
मतदानाची तारीख दोन दिवसांवर आली तरीदेखील खासदारांनी भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.
भाजपच्या या मतांवर डोळा ठेवूनच आमदार जयंत पाटील आणि आमदार पतंगराव कदम यांनी तासगावच्या निवडणुकीकडे कानाडोळा केल्याची चर्चा असून, या मतदानानंतरच हे दोन्ही नेते तासगावकडे लक्ष केंद्रित करतील, अशी चर्चा आहे.
खासदार समर्थकांचे मतदान निर्णायक ?
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदार असणाऱ्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचे प्रत्येक मत विजयी होण्यासाठी लाखमोलाचे ठरणार आहे. तासगावात खासदार संजयकाका पाटील समर्थक १४ मते आहेत, तर जिल्हा परिषदेचे एक मतही खासदारांच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. खासदारांची १५ मते विधानपरिषदेसाठी निर्णायक ठरणारी आहेत. ही मते कोणाच्या पारड्यात टाकायची, याबाबत अद्याप खासदारांकडून कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळेच दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची गोची झाली आहे.

Web Title: Pantangrao, Jayantraovaa to Kandalola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.