जतमध्ये कागदोपत्रीच पंचनामे

By Admin | Updated: April 27, 2015 00:15 IST2015-04-26T23:38:26+5:302015-04-27T00:15:49+5:30

प्रशासनाचा अजब कारभार : ४२३९ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

Pankema | जतमध्ये कागदोपत्रीच पंचनामे

जतमध्ये कागदोपत्रीच पंचनामे

संख : मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने जत तालुक्यातील ४ हजार २३९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. खरिपाच्या पिकासह द्राक्ष, डाळिंब फळबागांचे नुकसान झाले. अवकाळीचा सर्वाधिक फटका बेदाणा उत्पादक, फळबागायतदारांना बसला आहे. द्राक्ष बागांचेही नुकसान झाले होते. परंतु प्रशासनाने जागेवर न जाता वस्तुनिष्ठ पंचनामे केलेले नाहीत. ५० टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत.
अवकाळी पावसाने तालुक्यामध्ये १० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु प्रशासनाने कमी नुकसानीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार १ कोटी ५० लाख ८० हजार मदतीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला आहे. या प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना तुटपुंजीच मदत मिळणार आहे.रब्बी हंगामातील पिकांची उगवण चांगली झाली होती. शिवारभर पिके बहरली होती. चांगल्या उत्पादनाची आशा शेतकरी बाळगून होता. परंतु अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन हंगामातच पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षांना तडे गेले. निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. रॅकवर टाकलेला बेदाणा भिजला. बेदाणा काळा पडला. परिणामी उतारा कमी निघाला.जिल्हा प्रशासनाने कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवकांना संयुक्तपणे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु पंचनामे वस्तुनिष्ठपणे केलेले नाहीत. जास्त नुकसान होऊनही ५० टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे.
पंचनाम्यानुसार ४ हजार २३९ शेतकऱ्यांचे २ हजार १७३.५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामध्ये ज्वारीचे १ हजार ८५६ हेक्टर, हरभरा १६३.३५ हेक्टर, गहू ११८.८७ हेक्टर, द्राक्षे ०० हेक्टर, बेदाणा ९८५.५० टनाचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. शासनाकडे १ कोटी ५ लाख ८० हजार रुपये मदतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात पिकांचे, द्राक्षे, बेदाणा, डाळिंबाचे नुकसान जादा झाले आहे. (वार्ताहर)


अवकाळीचे पंचनामे चुकीचे केलेले आहेत. त्यामुळे बाधित क्षेत्र कमी झाले आहे. युती शासनाने शेतकऱ्यांना नुकसान मदतीची रक्कम वाढवावी. पंचनामे वस्तुनिष्ठ करण्याची आमची मागणी आहे.
- चंद्रशेखर रेबगोंड
पूर्व विभाग अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Pankema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.