पंडितजींच्या बासरीने सांगलीकरांना जिंकले...
By Admin | Updated: September 13, 2015 22:22 IST2015-09-13T22:22:55+5:302015-09-13T22:22:55+5:30
सांगलीत कार्यक्रम : शास्त्रीय गायन, वादनाने मैफिलीत रंग

पंडितजींच्या बासरीने सांगलीकरांना जिंकले...
सांगली : रसिकमनांना कवेत घेत अवीट गोडीच्या संगीताने घातलेली मोहिनी... अविस्मरणीय क्षणांना मनात खोलवर साठविण्यासाठी आतुर झालेली मने... अशा सुंदर वातावरणात पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीच्या स्वररंध्रांमधून झालेला स्वराविष्कार हृदयाला साद घालीत तल्लीन होऊन सांगलीकरांवर मनसोक्त बरसला.संगीताचार्य द. वि. काणेबुबा प्रतिष्ठानच्या गुरूकुलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीत रविवारी विशेष मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीत पंडित हरिप्रसाद चौरासियांच्या बासरीच्या सुरांनी हजारो रसिकांनी खचाखच भरलेले भावे नाट्यगृह न्हाऊन निघाले. त्यांनी बासरीवादनाची सुरुवात मत्त तालातील राग मारुबिहागने केली. त्यांनी तीन तालातील भूप रागात बंदिशी सादर केली. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक पंडित विजय घाटे यांनी तबलासाथ, तर सुनील अवचट यांनी बासरीसाथ दिली. पंडित हरिप्रसाद चौरासिया व विजय घाटे यांच्यात झालेल्या जुगलबंदीने रसिक तृप्त झाले.
याआधीच्या सत्रामध्ये पंडित उल्हास कशाळकर यांचे गायन झाले. त्यांनी मैफिलीची सांगता ठुमरीने केली. त्यांना पंडित सुरेश तळवळकर यांनी तबलासाथ, तर श्रीराम हबसनीस यांनी संवादिनीसाथ दिली. कशाळकर यांनी गायनाची सुरूवात मुलतानी रागाने केली. ‘कवन देस’ झुमरा तालात गायिले. त्यानंतर गौड मल्हार राग गायिला.
सुरुवातीला जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते झेंडे महाराज, उद्योगपती विजय पुसाळकर, काकासाहेब चितळे, गणेश गाडगीळ यांच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वलन झाले. गुरुकुलच्या विश्वस्त मंजुषा पाटील यांनी स्वागत केले. गुरुकुलवरील माहितीपत्राचे सादरीकरणही झाले. याविषयी डॉ. विकास कशाळकर यांनी माहिती दिली. विनिता तेलंग यांनी सूचसंचालन केले, तर डॉ. बाळकृष्ण चैतन्य यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)