गटारी, नाल्यांची पंचनामा मोहीम सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:34+5:302021-02-05T07:24:34+5:30

सांगली : महापालिका क्षेत्रामध्ये आजपर्यंत कोट्यवधींची गटारी, ड्रेनेज व नाल्यांची कामे झाली. परंतु चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या गटारी, नाल्यांवरील अतिक्रमणे, ...

Panchnama campaign will be started for gutters and nallas | गटारी, नाल्यांची पंचनामा मोहीम सुरू करणार

गटारी, नाल्यांची पंचनामा मोहीम सुरू करणार

सांगली : महापालिका क्षेत्रामध्ये आजपर्यंत कोट्यवधींची गटारी, ड्रेनेज व नाल्यांची कामे झाली. परंतु चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या गटारी, नाल्यांवरील अतिक्रमणे, नाले वळविणे, ड्रेनेजच्या समस्या या सर्वांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. याचा पंचनामा करून नागरिकांची श्वेतपत्रिका काढण्याची मोहीम सुरू करणार असल्याचे सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. अमित शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. गटारी, ड्रेनेज व नाल्यांची कामे

अमित शिंदे म्हणाले की, महापालिका क्षेत्रामध्ये दरवर्षी कोट्यवधींची गटारी, ड्रेनेज व नाल्यांची बांधकाम, दुरूस्तीची कामे केली जातात. नाले सफाई व नाले दुरूस्तीसाठी दरवर्षी भरमसाठ निधी खर्च केला जातो. ड्रेनेज योजनांची कामे नित्याचीच झाली आहेत, परंतु या सर्वांचा फायदा होण्याऐवजी चुकीच्या कामांमुळे व बेकायदेशीर कामांना अभय दिल्यामुळे नागरिकांना तोटाच होत आहे. खर्च केलेला कोट्यवधीचा निधी अक्षरश: वाया जात आहे. यामुळे आरोग्याचे व पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण होण्यासोबतच वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे नागरिकांमध्ये भांडणतंटेसुद्धा होताना दिसत आहेत. यातून सांगली जिल्हा सुधार समितीकडे रोज शेकडो तक्रारी येत आहेत. त्यामुळे या कामांचे परीक्षण करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

या गटारी, नाले व ड्रेनेजच्या कामांचा जागेवर पंचनामा करण्याची मोहीम आम्ही येत्या सोमवारी १ फेब्रुवारीपासून सुरू करत आहोत. या मोहिमेमध्ये गटारीच्या कामाचा दर्जा, त्याची विविध पाणी वाहन क्षमता, डहाळ, सुरुवात व शेवट, नाल्यांची प्रत्यक्ष अवस्था, त्यावर केलेला खर्च याचा पंचनामा करण्यासोबतच नागरिकांना याचा फायदा झाला की तोटा, याचा अभिप्राय घेऊन या सर्व कामांची "नागरिकांची श्वेतपत्रिका" काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर हा अहवाल जनतेसमोर मांडण्यासोबतच शासनाला सादर करून त्याबाबत मागण्या करणार आहोत. तरी ज्या भागांत नागरिकांना या गटारी, नाले यांचा त्रास होत आहे, त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे. यावेळी जयंत जाधव, महालिंग हेगडे, अल्ताफ पटेल, संतोष शिंदे, प्रशांत साळुंखे, दत्ता पाटील, अभिषेक खोत, सुरेश हक्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Panchnama campaign will be started for gutters and nallas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.