पलूस (जि.सांगली) : पलूसचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार (वय २६) यांचे धावण्याच्या सरावावेळी सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.अथर्व कुंभार यांचे बिहारमधील गया येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी (ओटीए) मध्ये प्रशिक्षण चालू होते. प्रशिक्षण काळात लष्करातील जवानांना दिवसा धावल्यामुळे उष्णतेचा जास्त त्रास होतो, म्हणून मध्यरात्री १२ च्या दरम्यान २० किलोमीटर धावण्याचा सराव घेतला जातो. या सरावावेळी अथर्व यांनी तब्बल १९ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले होते. उर्वरित अवघे ५०० मीटर अंतर बाकी असताना त्यांना त्रास सुरू झाला. त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. तातडीने सैनिक वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.अथर्व यांचे शालेय शिक्षण किर्लोस्करवाडी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण आण्णासाहेब डांगे महाविद्यालयात झाले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन त्यांनी दोन वर्षे पुणे येथे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी केली. स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून अवघ्या चार महिन्यांपूर्वी त्यांची निवड लेफ्टनंट पदासाठी झाली. त्याचे प्रशिक्षण बिहारच्या गया येथील ट्रेनिंग अकॅडमीत चालू होते. पलूस शहरातून मंगळवारी सकाळी अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, एक बहीण, चुलते असा परिवार आहे.आनंद काही दिवसांचाचअथर्व यांनी लहानपणापासूनच देशसेवा करण्याचे स्वप्न बाळगले होते. काही काळ आयटी क्षेत्रात काम केले. लेफ्टनंटपदी त्यांची निवड झाली. चार महिन्यांच्या प्रशिक्षणाचा काळ होता. घरात त्यांच्या निवडीने आनंदी वातावरण होते. मात्र, निधनाने त्यांच्या घरातील आनंदाची जागा वेदनेने घेतली.
Sangli: धावण्याच्या सरावावेळी पलूसच्या जवानाचा मृत्यू, चार महिन्यांपूर्वी झाली होती लेफ्टनंट पदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:40 IST