पालिका बजेट ६८३ कोटींवर

By Admin | Updated: May 19, 2016 00:25 IST2016-05-18T23:40:31+5:302016-05-19T00:25:25+5:30

नगरसेवक खुशीत : स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात ८० कोटींची वाढ

Palika budget of 683 crores | पालिका बजेट ६८३ कोटींवर

पालिका बजेट ६८३ कोटींवर

सांगली : महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकात कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. स्थायी समितीने सादर केलेल्या ६०३ कोटीच्या अंदाजपत्रकात महापौर हारूण शिकलगार यांनी तब्बल ८३ कोटींची वाढ केली. आता महापालिकेचे अंदाजपत्रक ६८३ कोटीवर पोहोचले असून सर्वपक्षीय नगरसेवकांना अंदाजपत्रकात खूश करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी ५५८ कोटी ८५ लाख रुपये जमेचे व ३६ लाख ३८ हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. या अंदाजपत्रकावर स्थायी समितीच्या सदस्यांनी सूचना करून त्यात १७ कोटींची वाढ करीत ६०३ कोटी २३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक महासभेकडे सादर केले होते. महासभेत सर्व सदस्यांच्या सूचनांसह अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार महापौर हारूण शिकलगार यांनी महापालिकेचे अंदाजपत्रक अंतिम केले असून त्यात ८३ कोटीची वाढ केली.
महापौर शिकलगार यांनी सर्वच नगरसेवकांना खूश केले आहे. नगरसेवकांनी सुचविलेल्या प्रभागातील विकास कामांचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही नगरसेवकांना दुखविण्यात आलेले नाही. त्याशिवाय प्रभाग समित्यांच्या निधीतही भरघोस वाढ केली आहे. शहरातील चारही प्रभाग समित्यांना प्रत्येकी दोन कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील विस्तारित भाग व उपनगरांतील समस्या वाढत आहेत. त्यासाठी महापौरांनी उपनगरांसाठी खास सात कोटीच्या निधीची तरतूद केली आहे. शामरावनगरमधील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. ठिकठिकाणी कूपनलिका खोदल्या जाणार आहेत. एकूणच अंदाजपत्रकाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)

मदनभाऊंच्या नावे विविध उपक्रम
महापालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते मदनभाऊ पाटील यांच्या नावाने काही उपक्रम हाती घेण्याचा मानसही महापौर हारूण शिकलगार यांनी अंदाजपत्रकात व्यक्त केला आहे. त्यानुसार मिनी क्रीडांगण, आरोग्य केंद्रासह मदनभाऊंच्या नावे क्रीडा पुरस्कार देण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. झोपडपट्टीमधील आदर्श महिलांना ‘गृहिणी पुरस्कार’ही नव्याने सुरू करण्याची शिफारस अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. मिरजेतील सर्व्हे नंबर ९५४ मध्ये मदनभाऊ पाटील बाग विकसित करण्यात येणार आहे. या जागेला कुंपण घालण्यासाठी निधीची तरतूद केली आहे.

Web Title: Palika budget of 683 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.