‘कृष्णा’च्या रणांगणावर रंगू लागल्या पैजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:24 IST2021-03-14T04:24:24+5:302021-03-14T04:24:24+5:30
सुरेश भोसले, इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम ...

‘कृष्णा’च्या रणांगणावर रंगू लागल्या पैजा
सुरेश भोसले, इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच तिन्ही पॅनेलचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले आहेत. तिरंगी लढतीची चर्चा रंगू लागली आहे. या चर्चेतूनच कार्यकर्ते आता पैजा लावू लागले आहेत.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोशल मीडियावर प्रचाराचा धडाका लावला आहे. सहकार पॅनेलचे डॉ. अतुल भोसले यांनी विविध गावांतून बैठका घेऊन रयत आणि संस्थापक पॅनेलला टार्गेट केले आहे. त्यांच्या सभेला ऊस उत्पादकांची गर्दी असते, असा दावा त्यांच्या पॅनेलमधून केला जात आहे. संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांच्या बैठकांनाही सभासदांचा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांच्या प्रचार प्रमुखांनी केला आहे. सहकार आणि संस्थापक पॅनेलमध्ये जोरदार लढत होणार असल्याचे सांगितले जात असून, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीच्या अगोदरच जेवणावळी आणि काही रकमेच्या पैजा लावल्या जात आहेत.
तिन्ही पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले, अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते यांनी संपर्क दौरे सुरू केले आहेत. सहकार आणि संस्थापक पॅनेलकडून विविध गावांतून थेट बैठका घेतल्या जात आहेत. रयत पॅनेलचे डॉ. मोहिते सभासदांच्या घरातील काही कार्यक्रमांना हजेरी लावून प्रचार करताना दिसतात.
चौकट
चर्चा रंगली
कापूसखेड (ता. वाळवा) येथील माजी सरपंच प्रदीप पाटील यांना कृष्णा उद्योग समूहातील पदाधिकारी भेटण्यास आले होते. यावेळी तिन्ही पॅनेलचे कार्यकर्तेही एकत्र आल्याने चर्चा रंगली होती. काही पदाधिकाऱ्यांनी तिकीट वाटपाचे काम पॅनेल प्रमुखांच्या परस्परच घेतल्याचेही दिसून येत आहे.