मिरजेत घर पाडल्याप्रकरणी पाेलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:23 IST2021-04-05T04:23:57+5:302021-04-05T04:23:57+5:30
सांगली : विद्यानगर (मिरज) येथील गृहनिर्माण संस्थेमध्ये असलेला प्लॉट घेण्याच्या उद्देशाने घर पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या महादेव धुमाळ या ...

मिरजेत घर पाडल्याप्रकरणी पाेलीस निलंबित
सांगली : विद्यानगर (मिरज) येथील गृहनिर्माण संस्थेमध्ये असलेला प्लॉट घेण्याच्या उद्देशाने घर पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या महादेव धुमाळ या पोलीस हवालदारास निलंबित करण्यात आले. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतचे आदेश दिले. धुमाळ सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे कार्यरत होता. याप्रकरणी धुमाळसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यानगर येथील वसंत सहकारी भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्थेमध्ये फिर्यादी सुदाम कृष्णा सरवदे यांची मिळकत आहे. याठिकाणी असलेले घर पाडल्याप्रकरणी सरवदे यांनी पोलीस हवालदार महादेव तुळशीराम धुमाळ, भाऊ सहदेव तुळशीराम धुमाळ आणि वडील तुळशीराम धुमाळ या तिघांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. धुमाळ व सरवदे यांचे प्लॉट शेजारी असून, सरवदे यांचा प्लॉट धुमाळ विकत मागत होते. मात्र, तो सरवदे यांनी न दिल्याने त्यांच्यात वाद झाला होता. जाण्यासाठी असलेला रस्ताही बंद करण्यात आल्याचा प्रकार घडला होता.
सरवदे यांच्या जागेवर असलेले बांधकाम पाडल्याचे समजल्याने ते आले असता त्यावेळी धुमाळ यांनी दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. याप्रकरणी सरवदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पोलीस कर्मचारी धुमाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला होता. याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी धुमाळ यास निलंबित केले आहे.