पाडव्यालाच उभारली पहिलीच्या प्रवेशाची ‘गुढी’
By Admin | Updated: March 24, 2015 00:16 IST2015-03-23T22:53:19+5:302015-03-24T00:16:46+5:30
मुहूर्तावर प्रवेश : मिरज तालुक्यात २५०० बालसवंगडी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल

पाडव्यालाच उभारली पहिलीच्या प्रवेशाची ‘गुढी’
प्रवीण जगताप - लिंगनूर--दरवर्षी जिल्हा परिषद शाळांची पहिली, पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी पटाची जुळवाजुळव करताना दमछाक होते. विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरू होते. परंतु यंदा मिरज पंचायत समितीचे अधिकारी व शिक्षकांच्या पद्धतशीर नियोजनामुळे तालुक्यात सुमारे बावीसशे ते अडीच हजार मुलांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यांच्या ज्यादा दोन महिन्यांच्या शिकवणीचे वर्ग सुरू करून जिल्हा परिषद शाळांच्या प्रशासनाने बाजी मारली आहे. पहिलीच्या वर्गात ३८ पटसंख्येपर्यंत उच्चांकी प्रवेश झाल्याने मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी पहिला क्रमांक पटकाविला आहे. याबाबत तंतोतंत आकडेवारीचे कामही पंचायत समितीत युद्धपातळीवर सुरू असल्याचे मिरज पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी गणेश भांबुरे यांनी सांगितले. पूर्वी गुढीपाडव्याला शाळेत पाटीपूजनाचा कार्यक्रम घेतला जात असे. याचदिवशी ज्या विद्यार्थ्याचे वय सहा वर्षे पूर्ण आहे, त्यांचे पालक पाडव्याच्या मुहूर्तावर विद्यार्थ्याचे नाव शाळेमध्ये दाखल करायचे.
कालानुरूप यात बदल झाले. निमशहरी भागातील शाळांत पाटीपूजनही बंद झाले, तसेच पहिलीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शैक्षणिक वर्षानुसार जूनला करण्यात येऊ लागले. गुढीपाडव्याचा मुहूर्त पाळणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली. वाढत्या खासगी शाळा, मुलाची शाळा म्हणजे ‘सोशल स्टेटस’ हा समज, इंग्रजी शाळांचे वाढते आकर्षण, शाळांमधील प्रवेशाची स्पर्धा, यामुळे आजही बऱ्याच गावामध्ये गुरुजींनाच वह्या, पुस्तके घेऊन विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचावे लागत आहे.
मात्र मिरजेचे गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी, विस्तार अधिकारी गणेश भांबुरे, कें द्रप्रमुख यांच्या मदतीने, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या पुढाकाराने डिसेंबरअखेर कुटुंब सर्वेक्षण करून गुढीपाडव्यालाच पहिलीचे प्रवेश पूर्ण करायचा निर्णय घेण्यात आला.
या उपक्रमाला गेल्या दोन वर्षापासून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. यंदा तर गुढीपाडव्याला तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवरही चांगला प्रतिसाद मिळाला. अडीच हजारांच्या घरात पहिलीचे प्र्रवेश पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. महापालिका हद्दीनजीक असलेल्या इतर लहान शाळांमध्येही पहिलीचे प्रवेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुले आता जूनच्या अगोदरच मार्च-एप्रिलमध्येच अभ्यासाचे प्राथमिक धडे गिरवू लागल्याचे चित्र आहे.
गुणवत्तेमुळे पट सुधारतोय...
बेडगच्या गवरदेवीवाडी शाळेत अंगणवाडी जवळच असल्याने गुढीपाडव्याची वाट न पाहता दहा दिवस अगोदरच पहिलीची मुले बसू लागली होती. त्यांचे रितसर अर्जासह प्रवेश पाडव्याच्या मुहूर्तावर झाले असून कार्यक्षेत्राबाहेरील मुलांचाही ओढा गवरदेवीवाडी शाळेच्या नावलौकिकामुळे दिसून येत आहे. मिरज पूर्व भागातील बेडग क्र. १, आरगच्या दोन्ही शाळा निमशहरी गटात मोडणाऱ्या असूनही बेडग क्र. १ मध्ये ३५ मुलांचे प्रवेश पाडव्यालाच पूर्ण झाले आहेत. आरगच्या दोन्ही शाळांतही विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्तीतील प्रयत्नांमुळे पटाची स्थिती चांगली दिसून येते.
गुढीपाडव्याला तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेशास चांगला प्रतिसाद मिळाला असून १५ ते २० च्या सरासरीने प्रवेश होत आहेत. बऱ्याच शाळांतून ३५ ते ४० पर्यंतही प्रवेश होत आहेत. मार्चपासूनच पहिलीचे धडे देत असल्याने पालक व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळांची गोडी लागत आहे. अगदी महापालिका हद्दीलगतच्या लहान शाळांतही उल्लेखनीय प्रवेश होत आहेत.
- गणेश भांबुरे, विस्तार अधिकारी
पूर्वी गुढीपाडव्याला शाळेत पाटीपूजनाचा कार्यक्रम घेतला जात असे. याचदिवशी ज्या विद्यार्थ्याचे वय सहा वर्षे पूर्ण आहे, त्याचे पालक पाडव्याच्या मुहूर्तावर विद्यार्थ्याचे नाव दाखल करायचे.
कालानुरूप यात बदल झाले. पहिलीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश गुढीपाडव्याऐवजी शैक्षणिक वर्षानुसार जून महिन्यामध्ये करण्यात येऊ लागले.
प्रशासनाच्या पुढाकाराने डिसेंबरअखेर कुटुंब सर्वेक्षण करून गुढीपाडव्यालाच पहिलीचे प्रवेश पूर्ण करायचा निर्णय झाला. या उपक्रमाला गेल्या दोन वर्षापासून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.