गुंड म्हमद्या नदाफ जिल्ह्याबाहेर पसार
By Admin | Updated: November 22, 2015 00:04 IST2015-11-21T23:52:04+5:302015-11-22T00:04:36+5:30
पोलिसांची माहिती : दहा पथके रवाना; सांगली शहरात नाकाबंदी

गुंड म्हमद्या नदाफ जिल्ह्याबाहेर पसार
सांगली : येथील संजयनगरमधील गोरखनाथ ऊर्फ मनोज माने याचा खून करणारा गुंड म्हमद्या नदाफ हा कारवाईच्या भीतीने जिल्हाबाहेर पसार झाल्याची खात्रीशीर माहिती आहे. तो कुठे आश्रयाला जाऊ शकतो, याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. त्याच्या शोधासाठी असलेला शंभर पोलिसांचा ताफाही जिल्ह्याबाहेर रवाना केला आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. म्हमद्याच्या मालमत्तेवर ‘टाच’ आणण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
आर्थिक वाद व खंडणीचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने म्हमद्या नदाफ व त्याच्या साथीदारांनी मनोज मानेचा धारदार शस्त्रांनी हल्ला करुन खून केला होता. या घटनेला दहा दिवसांचा कालावधी होऊन गेला तरी म्हमद्या पोलिसांच्या हाताला लागला नाही. त्याला मदत करणाऱ्यांच्या नाड्या आवळल्यानंतर तो कदाचित शरण येईल, अशी पोलिसांना अपेक्षा होती. पण पोलीस आपले ‘एन्काऊंटर’ करतील, अशी त्याला भीती असल्याने तो फरारीच राहिला आहे. आई व भावाला तो भेटून गेल्याने पोलिसांनी गेल्या आठ दिवसात संजयनगर, अभयनगर, चैतन्यनगर, शिंदे मळा, हनुमाननगर, शंभरफुटी, कुपवाड या परिसरात ‘कोम्बिंग आॅपरेशन’ मोहीम राबविली. म्हमद्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. हाती काहीच लागले नाही.
म्हमद्या शहर व जिल्ह्यातून पसार झाल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याच्या शोधासाठी असलेले शंभरहून अधिक पोलीस जिल्ह्याबाहेर रवाना करण्यात आले आहेत. दोन दिवसापूर्वी तो हुबळीत आश्रयाला असल्याची माहिती मिळाल्याने पथक तातडीने रवाना केले होते. परंतु काहीच सुगावा लागला नाही. त्यामुळे पथक शुक्रवारी पहाटे हात हलवित परतले. (प्रतिनिधी)
पाच ताब्यात : ‘रेडलाईट’मध्ये तपासणी
शुक्रवारी रात्री पोलिसांनी काळ्या खणीजवळील प्रेमनगर येथील रेडलाईट परिसरात नाकाबंदी केली होती. रात्री आठ ते बारा या वेळेत नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पाचजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पण त्यांचा म्हमद्या नदाफ प्रकरणाची काहीही संबंध नाही. गोकुळनगर परिसरातही नाकाबंदीचे नियोजन होते. मात्र तिथे म्हमद्याच्या विरोधातील टोळीचे वास्तव्य असते. त्यामुळे म्हमद्या तिथे जाण्याचे धाडस करणार नाही, असा विचार करुन पोलिसांनी तिथे नाकाबंदी केली नाही.