सांगलीत हमालांचा उद्रेक
By Admin | Updated: October 7, 2016 00:04 IST2016-10-07T00:01:34+5:302016-10-07T00:04:21+5:30
कार्यालयातच ठिय्या : कर्मचाऱ्यावर फौजदारी दाखल करा

सांगलीत हमालांचा उद्रेक
सांगली : माथाडी महामंडळाच्या येथील कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे हमालांचा आर्थिकविषयक महत्त्वाचा डाटा नष्ट झाल्याच्या निषेधार्थ गुरूवारी हमालांनी कार्यालयात घुसून तेथेच ठिय्या मारला. हमालांच्या आर्थिक बाबींच्या फायलींचे नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई होईपर्यंत तेथून बाहेर न पडण्याचा पवित्रा हमालांनी घेतल्याने कार्यालयात काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर सरकारी कामगार अधिकारी तथा माथाडी मंडळाचे सचिव प्रवीण जाधव यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हमालांनी आंदोलन स्थगित केले.
गेल्या महिन्यात माथाडी महामंडळाच्या येथील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने आक्षेपार्ह संकेतस्थळ उघडल्याने हमालांच्या पगाराचा, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी, बोनस, अपघात नुकसान भरपाई, रजा कालावधीतील लाभ आदी आर्थिक बाबी असणारा डाटा नष्ट झाला असल्याचा आरोप हमाल पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. कार्यालयातील संगणक बंद असल्याने हमालांच्या फंडाची प्रकरणे, कर्ज प्रकरणे, नवीन नोंदणीचे काम पूर्णपणे थांबले होते. याबाबत चौकशी केली असता, संगणक दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे कारण देण्यात येत असल्याने हमालांमध्ये संताप होता. अखेर गुरूवारी चारशेवर हमालांनी माथाडी मंडळाच्या कार्यालयात घुसून, होणाऱ्या नुकसानीस कोण जबाबदार? असा सवाल उपस्थित केला. हमालांचा महत्त्वाचा डाटा नष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाईच्या मागणीवर हमाल ठाम होते. अखेर संबंधित कर्मचाऱ्यावर शुक्रवारी सायंकाळपर्यंत शिस्तभंगाच्या कारवाईबरोबरच त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आश्वासन सरकारी कामगार अधिकारी तथा माथाडी मंडळाचे सचिव प्रवीण जाधव यांनी दिल्यानंतर हमालांनी आंदोलन स्थगित केले.
यावेळी विकास मगदूम, बाळासाहेब बंडगर, गोविंद सावंत, आदगोंडा गौंडाजे यांच्यासह चारशेवर हमाल उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पॉर्न फिल्मने डाटा गेल्याची तक्रार
कार्यालयातील संगणकावर कर्मचाऱ्याने पॉर्न वेबसाईट उघडल्यानेच हमालांचा महत्त्वाचा डाटा नष्ट झाल्याचा आरोप हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम यांनी केला. या कर्मचाऱ्याकडून सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य होणे चुकीचे असून शासकीय मालमत्तेचा गैरवापर या कर्मचाऱ्याकडून झाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही मगदूम यांनी केली.