ताकद आमची-आमची...
By Admin | Updated: September 20, 2014 00:30 IST2014-09-19T23:50:45+5:302014-09-20T00:30:50+5:30
सरकारनामा

ताकद आमची-आमची...
भाजपचं कमळ फुलवणाऱ्यांची डोकी वाढत असताना महायुतीतल्या शिवसेनेच्या धनुष्यबाणापासून मात्र चार हात लांब थांबण्याची काळजी सांगलीतली काँग्रेस-राष्ट्रवादीची मंडळी घेताहेत. फाटून चिंध्या झालेल्या शिवसेनेची जिल्हाभरातील ताकद, पक्ष वाढवण्यापेक्षा ‘सेटलमेंट’कडं (तीही किरकोळ चिरीमिरीसाठी) बघणारे पावशेर आजी-माजी नेते, मनसेनं पळवलेले रेडिमेड सैनिक, केंद्रात आलेली भाजपची सत्ता (महायुतीची नव्हे! हवं तर अमितभार्इंना विचारा), मोदींची हवा यामुळं इथं ‘धनुष्यबाण, नको रे’, म्हणणारेच जास्त भेटतात. विट्याचे अनिल बाबर आणि कवठेपिरानचे भीमराव माने यांनी भगवा हातात घेतलाय, तो शिवसेनेच्या तिकिटासाठी. ती त्यांची राजकीय अपरिहार्यता! कारण खानापूर आणि इस्लामपूरची जागा शिवसेनेकडं जाणार असल्याचं निश्चित असल्यानं त्यांनी ही उडी मारलीय. महायुती सत्तेवर येणार असल्याची हवा महिन्यापूर्वी जोरात वाहत होती. त्यामुळं बाबर आणि माने यांनी गडबडीनं महायुतीच्या गाडीत जागा पटकावली. (गेल्या दोन दिवसात मात्र युतीतील तणावाच्या चर्चेनं इच्छुकांना भंडावून सोडलंय...) इस्लामपुरातून नानासाहेब महाडिकांनी हात पुढं करूनही ‘मातोश्री’वरून टाळी मिळालेली नाही. त्यांच्या रूपानं ‘मनी’ आणि ‘मसल’ पॉवर असणारा आयता उमेदवार मिळत असतानाही ‘असं का?’ याचं उत्तर मिळत नाही. आता सत्तासुंदरीला भुललेली मंडळी पुढंही धनुष्यबाण हातात ठेवतील की, ‘हाता’कडं आणि ‘घड्याळा’कडं पळतील, सत्ता आली नाही तर ही मंडळी पुन्हा सुंबाल्या करतील की, शिवसेनेतच राहतील, हे सवाल मात्र सेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला पडलेले नाहीत. वर्षानुवर्षं घोरत असलेल्यांना याचा बिलकूल घोर नाही. जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख किती आणि कोण-कोण आहेत, हेच मधल्या काळात कळत नव्हतं. (या प्रश्नावर संपर्कप्रमुख दिवाकर रावतेही बऱ्याचदा डोकं खाजवत असत म्हणे.)
तिकडं भाजप-सेनेतल्या तणावानं राजूभाई शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतही धाकधूक वाढलीय. कारण आपण आमदार होणार... सत्ता आल्यावर मंत्रीपद मिळणार (केंद्रात मोदींनी विचारलं नाही, निदान इथंतरी द्या!)... पोलिसांच्या काठ्या खाल्ल्याचं सार्थक होणार... अशी स्वप्नं त्यांच्यातल्या काहींना दिवसाढवळ्या पडू लागलीत. जागेच्या तिढ्यामुळं शिराळ्यात नाईकसाहेबांच्या हातात स्वत: राजूभार्इंनीच ‘कमळ’ दिलंय. आता महायुतीतल्या सगळ्याच घटकपक्षांची अवस्था मामाकडं शिक्षणासाठी रहायला आलेल्या भाचरांसारखी झालीय. मामा-मामीचं जमंना आणि शिक्षण सोडून गावाकडं जाता येईना!
‘मनसे’वाले तर एकमेकांवर ‘दिलसे’ बरसतात. जिल्ह्यात जेवढे कार्यकर्ते, तेवढेच गट असणारा हा एकमेव पक्ष! दोन-दोन जिल्हाध्यक्ष आणि दोन-दोन महिला अध्यक्षा... सगळ्या पदांचं सगळ्या गटांत समान वाटप. काही दिवसांपूर्वी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून मनसेत आलेले माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी चार दिवसांपूर्वी पुन्हा ‘मातोश्री’ गाठलं. मनसेत जाऊन पस्तावलेल्यांना, ब्ल्यू प्रिंटची झेरॉक्स काढण्याची वाट पाहणाऱ्यांना (हे पस्तावलेल्यांचं म्हणणं.) वाकुल्या दाखवत बहुदा बजरंगभाऊंनी काहीतरी पदरात पाडून घेतलेलं दिसतंय. (राजवाड्यात अस्वस्थ झालेल्या राजेंच्या येरझाऱ्या वाढल्या असतील.) जिल्ह्यात दोन-चार ठिकाणी केवळ मतदान यंत्रावर दिसण्यासाठी का होईना ‘रेल्वे इंजिन’वाल्यांची तयारी सुरू होती. आता त्यातलाही एक गळाला!
- श्रीनिवास नागे