जयंतराव असतील तर आमची उपस्थिती!
By Admin | Updated: November 14, 2014 23:23 IST2014-11-14T23:15:28+5:302014-11-14T23:23:01+5:30
उलटसुलट चर्चा : कारखाना गळीत हंगामास बहुतांशी पदाधिकाऱ्यांची दांडी

जयंतराव असतील तर आमची उपस्थिती!
अशोक पाटील - इस्लामपूर -जयंत पाटील यांनी १९९९ पासून सलग १५ वर्षे राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद सांभाळले. या काळात त्यांच्या मतदारसंघातील त्यांचे एकनिष्ठ, पै-पाहुणे आणि राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकारी त्यांच्या अवतीभवती वावरत. आता मंत्रीपद गेल्यानंतर प्रथमच राजारामबापू साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमात जयंत पाटील अनुपस्थित राहणार असल्याचे कळताच बहुतांश पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला दांडी मारली. यावरून जयंत पाटील असतील तरच आमचीही उपस्थिती राहील, अशी भूमिका या मंडळींची राहील, असे दिसत आहे.
राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी व जत या शाखांच्या गळिताचा प्रारंभ एकाच दिवशी झाला. अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी, इस्लामपूर पालिकेचे सत्ताधारी नगरसेवकांना दिले होते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना पत्रही पाठविले होते. निमंत्रणपत्रिकेवर प्रमुख पाहुण्यांसह जयंत पाटील यांच्या नावाचा समावेश होता. परंतु ऐनवेळी पाटील यांना शरद पवार यांनी मुंबई येथे बोलावून घेतले. त्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीत हे अगोदरच समजले. परिणामी अनेक पदाधिकारी व नेहमी त्यांच्या आजुबाजूला असणाऱ्यांनी गळीत हंगाम कार्यक्रमाला दांडी मारली. याची चर्चाही कार्यक्रमस्थळी होती. गर्दी कमी असल्याचे पाहून मंत्रीपद गेल्यानंतर पाटील यांचा दबदबा कमी झाला का, असाही सवाल उपस्थित केला जात होता. कारखान्याची दुसरी शाखा सुरू होईपर्यंत ज्यांनी साखर वर्ज्य केली होती, त्या जनार्दनकाका पाटील व त्यांचे पुत्र माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील गव्हाणीत उसाची मोळी टाकण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर हजर झाले. असाच प्रकार अनेक नेत्यांबाबत घडला. ज्यांच्या मागे कसलीही ताकद नाही, असे पदाधिकारी मात्र पुढे-पुढे करून तोरा मिरवत होते. जयंत पाटील कार्यक्रमास उपस्थित असते, तर असे घडले असते का?, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची घोडदौड सुरू आहे. एकाच दिवशी चार कारखान्यांच्या गळीत हंगामाचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागली. या कार्यक्रमाचे निमंत्रण उद्योग समूहातील पदाधिकारी, पालिकेतील सत्ताधाऱ्यांना दिले होते. याव्यतिरिक्त स्वत:च्या सहीची पत्रेही पाठविली होती.
- पी. आर. पाटील, अध्यक्ष, राजारामबापू साखर कारखाना