लसीकरणासाठी शिक्षकांना घरोघरी फिरण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:20+5:302021-04-02T04:27:20+5:30
सांगली : ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी कोरोना लसीकरण १ एप्रिलपासून सुरू झाले. जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी यासाठी शिक्षकांना ...

लसीकरणासाठी शिक्षकांना घरोघरी फिरण्याचे आदेश
सांगली : ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी कोरोना लसीकरण १ एप्रिलपासून सुरू झाले. जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी यासाठी शिक्षकांना घरोघरी भेटी द्याव्या लागणार आहेत. त्याशिवाय विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास सुरू असतानाच त्यावरून पालकांचेही प्रबोधन करावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी तसे आदेश गुरुवारी (दि. १) काढले. जिल्ह्यात दररोजची रुग्णसंख्या २०० हून अधिक झाली आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम स्वरुपात राबवावे लागणार असल्याचे डुडी म्हणाले. त्यामध्ये शिक्षक, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल आदींचा सहभाग घेतला जाणार आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने पालकांना मोबाईलवरून संपर्क साधता येतो. त्याचा फायदा घेत शिक्षकांनी ४५ वर्षांवरील पालकांना लसीकरणासाठी उद्युक्त करायचे आहे. घरोघरी भेटी देऊन पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी केंद्रावर पाठवायचे आहे. केंद्रावर उपस्थित राहून लसीकरणासाठी तलाठी व ग्रामसेवक यांच्याशी समन्वय राखायचा आहे.
डुडी म्हणाले की, सरपंच, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांनी लाभार्थ्यांचे प्रबोधन करायचे आहे. गावात दवंडी देऊन आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीवरूनही नागरिकांना आवाहन करता येईल. अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी मोहिमेत भाग घ्यायचा आहे. मोहिमेसाठी विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांची आरोग्य केंद्रनिहाय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.
चौकट
दररोज १५० जणांना लस
दिव्यांग व दुर्धर आजारी व्यक्तींना केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था ग्रामदक्षता समितीने करायची आहे. ४५ वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांना कोणत्याही आजाराच्या प्रमाणपत्राशिवाय सरसकट लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज किमान १५० जणांना लस देण्याचे नियोजन आहे.