सांगली : जिल्हा परिषदेचा १५ कोटी ३६ लाखांचा निधी शासनाकडे थकित असल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे आज (शुक्रवारी) तक्रार करताच, त्यांनी पुणे कार्यालयाशी संपर्क साधून थकित निधी तातडीने देण्याची सूचना दिली. विशेष म्हणजे त्यांनी आदेश दिल्यापासून अर्ध्या तासामध्ये थकित पाच कोटी ४४ लाखांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्याचा संदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांना आला.आज जिल्हा परिषदेतील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त चोक्कलिंगम आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती पपाली कचरे, माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, सदस्य संजीवकुमार सावंत आदींनी त्यांची भेट घेऊन थकित पंधरा कोटींचा निधी देण्याची विनंती केली. यावेळी चोक्कलिंगम यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून थकित निधी तातडीने वर्ग करण्याची सूचना केली. जिल्हा परिषदेतून ते विजयनगर येथील प्रशासकीय इमारत पाहण्यासाठी गेले. त्यात अर्ध्या तासाचा कालावधी गेला. तोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांना पाच कोटी ४४ लाखांचा निधी जि. प.कडे वर्ग केल्याचा संदेश मिळाला. निधी मिळाल्याची लोखंडे यांनी पदाधिकाऱ्यांना माहिती देताच त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता.दरम्यान, आढावा बैठकीत चोक्कलिंगम यांनी, ३ ते ६ वयोगटातील बालकांबरोबर सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचेही आधार कार्ड काढण्याची विशेष मोहीम राबविण्याची सूचना दिली. त्यानुसार सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे, असेही लोखंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आठ लाचखोरांवर कारवाई करा जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नवाळे यांच्यासह आठ कर्मचारी लाच घेताना सापडले होते. यांच्यावर तात्काळ दावा दाखल करून कारवाई करण्याची सूचना विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी लोखंडे यांना दिली. लोखंडे यांनी, आठवड्यात या सर्वांवर दावा दाखल करून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
आदेश निघाला आणि साडेपाच कोटी आले!
By admin | Updated: March 13, 2015 23:56 IST