विद्यार्थी वाहतूक वाहनांच्या सर्व्हेचे आदेश
By Admin | Updated: July 28, 2014 23:22 IST2014-07-28T22:42:06+5:302014-07-28T23:22:22+5:30
दिलीप सावंत : बेकायदेशीर वाहने जप्त करणार, कडक अंमलबजावणी

विद्यार्थी वाहतूक वाहनांच्या सर्व्हेचे आदेश
सांगली : जिल्ह्यात हजारोच्या घरात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वाहने आहेत. ही वाहने आरटीओंकडे नोंदणीकृत आहेत का नाहीत, याबाबत सर्व्हे केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दिली. बेकायदेशीर वाहने जप्त करुन पुढील कारवाईसाठी आरटीओंकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असेही ते म्हणाले.
येळावी (ता. तासगाव) येथे स्कूल व्हॅनचालकाने मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे वृत्त आज (सोमवार) ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाले. जिल्ह्यात अनेक वाहनांतून विद्यार्थ्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असून, वाहनचालकांची चारित्र्य व वैद्यकीय तपासणी केली जात नसल्याच्या गोष्टीवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. या वृत्ताची सावंत यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रश्नी त्यांनी आरटीओ हरिश्चंद्र गडसिंग यांच्याशी चर्चाही केली.
सावंत म्हणाले की, पालकांनीही मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांना शाळेत सोडण्यासाठी वाहन लावले पाहिजे. मात्र हे वाहन नोंदणीकृत आहे का नाही, याची तपासणी केली पाहिजे. मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. कोणता वाहनचालक कमी पैसे घेतो, हे पाहून त्या वाहनातून सोडण्याकडे पालकांचा कल असल्याचे दिसून येते. त्यांनी तसा विचार करु नये. वाहन व त्यावरील चालकाचे वर्तन चांगले आहे का, याकडे पाहिले पाहिजे.
चालक असभ्य वर्तन करीत असल्याचे मुलांनी घरी सांगितले, तर पालकांनी गप्प बसू नये. तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार करावी. (प्रतिनिधी)
४ आरटीओ गडसिंग म्हणाले, येळावीत झालेली घटना मनाला चटका लावणारी आहे. ती व्हॅन जप्त केली आहे. संशयित चालकाने विद्यार्थी वाहतुकीचा परवाना घेत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या चारित्र्याचा दाखला कसा मिळणार? पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती मागविली आहे. ही माहिती मिळताच संशयिताचे ‘लायसन्स’ व वाहनाचा परवाना रद्द केला जाईल.