एलबीटीप्रश्नी कारवाई थांबविण्याचे आदेश
By Admin | Updated: November 16, 2014 00:11 IST2014-11-16T00:11:28+5:302014-11-16T00:11:28+5:30
व्यापाऱ्यांची माहिती : महापालिकेकडून आदेशाबाबत इन्कार

एलबीटीप्रश्नी कारवाई थांबविण्याचे आदेश
सांगली : महापालिकेने सुरू केलेली एलबीटीविरोधातील कारवाई थांबवावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे दिल्याची माहिती आज एलबीटीविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे महापालिका जनसंपर्क अधिकाऱ्यांनी असा कोणताही आदेश महापालिकेला प्राप्त झाला नसल्याचे सांगितले आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून एलबीटी (स्थानिक संस्था कर) भरण्यावर बहिष्कार टाकला आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने अशा व्यापाऱ्यांवर कारवाईची मोहीम उघडली आहे. त्यामुळे व्यापारी व महापालिकेतील संघर्ष आता टोकाला गेला आहे. एलबीटीचा प्रश्न सुटेपर्यंत महापालिकेने कारवाई थांबवावी, अशी मागणी कृती समितीने अनेकदा केली होती. महापालिकेने त्यांची ही मागणी धुडकावून लावली होती. त्यानंतर राज्यातील व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनाही तशा आशयाचे पत्र दिले होते. आज यासंदर्भात फडणवीस यांनी आदेश दिल्याचे व्यापाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
पत्रकात म्हटले आहे की, येत्या दोन दिवसांत कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची तयारी महापालिकेने केल्याची माहिती व्यापाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे याबाबतची माहिती आ. सुधीर गाडगीळ यांना देण्यात आली. गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली. कारवाई थांबविण्याबाबत महापालिकेला सूचना देण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर फडणवीस यांनी दूरध्वनीवरूनच आयुक्त अजिज कारचे यांच्याशी संपर्क साधून कारवाई न करण्याबाबतचे आदेश दिले. गाडगीळ यांनीही व्यापाऱ्यांना एलबीटीसंदर्भात कारवाई होऊ न देण्याचे आश्वासन दिले. भाजपने एलबीटी रद्द करण्याबाबत लेखी आश्वासन यापूर्वीच दिले असल्याने लवकरच याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही गाडगीळ यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. एलबीटीविरोधी कृती समितीने याबाबत लवकरच मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती समीर शहा, विराज कोकणे यांनी दिली.