अंगणवाडी सेविकांना मोबाईल तातडीने परत करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST2021-09-17T04:31:18+5:302021-09-17T04:31:18+5:30

सांगली : अंगणवाडी सेविकांनी मोबाईल वापसी आंदोलनांतर्गत कार्यालयात जमा केलेले संच त्वरीत परत करण्याचे आदेश एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे ...

Order to return mobiles to Anganwadi workers immediately | अंगणवाडी सेविकांना मोबाईल तातडीने परत करण्याचे आदेश

अंगणवाडी सेविकांना मोबाईल तातडीने परत करण्याचे आदेश

सांगली : अंगणवाडी सेविकांनी मोबाईल वापसी आंदोलनांतर्गत कार्यालयात जमा केलेले संच त्वरीत परत करण्याचे आदेश एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प संचालक रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत. फोन दुरुस्त करुन घेतले नाहीत तर त्याला सेविका जबाबदार राहतील असे आदेशात म्हंटले आहे.

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी मोबाईल वापसी आंदोलन केले आहे. अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीने शासनाने दिलेले मोबाईल परत केले आहेत. मोबाईलमधील पोषण आहार ट्रॅकर मराठी भाषेत असावे आणि दुरुस्तीचा खर्च मिळावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. सांगली जिल्ह्यात सुमारे २९०० सेविकांनी मोबाईल जिल्हा परिषद व पंचायत समित्यांकडे सुपूर्द केले आहेत.

आंदोलनाची दखल घेत आयुक्त अग्रवाल यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. मोबाईलच्या अडचणींसंदर्भात फोन पुरवठादाराशी चर्चाही केली. नादुरुस्त मोबाईल त्वरीत दुरुस्त करुन देण्यास सांगितले असून पुरवठादाराने त्याला सहमती दर्शविली आहे. त्यामुळे सर्व जिल्हा परिषदांतील बालविकास प्रकल्पाधिकाऱ्यांनी मोबाईल सेविकांना परत करावेत असे अग्रवाल यांनी आदेशात म्हंटले आहे. सेविकांनी मोबाईल कंपनीच्या सेवा केंद्रात जाऊन दुरुस्ती करुन घ्यायची आहे. दुरुस्ती करुन घेतली नाही तर त्याला सेविका स्वत: जबाबदार राहतील असेही आयुक्तांनी म्हंटले आहे.

चौकट

दबाव टाकण्याचा प्रयत्न

दरम्यान, कृती समितीच्या रेखा पाटील यांनी सांगितले की, याद्वारे सेविकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. अधिकारीही मोबाईल नेण्यासाठी सेविकांना धमकावत आहेत. आयुक्तांनी बैठकीत दुरुस्तीविषयक मार्ग काढला असला तरी पोषण आहार ट्रॅकर ॲपच्या भाषेविषयी निर्णय झालेला नाही.

Web Title: Order to return mobiles to Anganwadi workers immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.