विट्यातील गाळे काढून घेण्याचे आदेश

By Admin | Updated: May 28, 2016 00:53 IST2016-05-27T23:51:32+5:302016-05-28T00:53:46+5:30

बांधकाम समितीत निर्णय : कणेगावच्या कमानीचा प्रस्ताव फेटाळला

Order to be removed from the bricks | विट्यातील गाळे काढून घेण्याचे आदेश

विट्यातील गाळे काढून घेण्याचे आदेश

सांगली : विटा येथील जिल्हा परिषदेच्या दुकान गाळ्यांतील सहा दुकानदारांनी कराराचा भंग केला आहे. यामुळे त्यांच्याकडील गाळे काढून घेऊन ते अन्य व्यक्तींना भाड्याने देण्याचा निर्णय जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
तसेच जीवन प्रबोधनी आणि नगरवाचनालय यांच्याकडून भाड्याची थकीत रक्कम आठ दिवसात वसूल करण्याचा निर्णय झाला. तसेच कणेगाव (ता. वाळवा) येथील दोन व्यक्तींनी स्वागत कमानीसाठी प्रस्ताव पाठविल्यामुळे दोन्ही प्रस्ताव फेटाळण्यात आले. ग्रामपंचायतीने तेथील कायदा सुव्यवस्थेचा विचार करून दोन्ही स्वागत कमानींच्या जागा निश्चित करून फेरप्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सभापती भाऊसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम समितीची बैठक झाली. विटा येथील खानापूर पंचायत समितीच्या उत्पन्नातून गाळे बांधले आहेत. या गाळ्यांचा अनधिकृत वापर सुरु असल्यावरून वाद निर्माण झाला होता. तसेच दोन संस्थांनी अनधिकृत बांधकाम केल्यावरूनही दोन सभांमध्ये वादळी चर्चाही झाली होती.
दोन्ही संस्थांनी तोडगा काढून वाद मिटविला. परंतु, गाळ्यांच्या थकीत भाड्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच काही गाळेधारक न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे भाडे वसुलीचा प्रश्न गंभीर निर्माण झाला असला तरी, यावेळी काही गाळेधारकांनी कराराचा भंग केला आहे. या कायद्यानुसार त्यांचे गाळे खाली करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली.
त्यानुसार गाळेधारकांकडून गाळे परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जीवन प्रबोधनी आणि नगरवाचनालयाकडून थकीत भाडे वसूल करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
कणेगाव येथील भीमराव आत्माराम पाटील यांनी स्वखर्चातून स्वागत कमान बांधण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत २७ एप्रिल २०१२ रोजी प्रस्ताव पाठविला होता. या गटाची सत्ता गेल्यानंतर अ‍ॅड्. विश्वासराव संपतराव पाटील यांनी स्वखर्चातून कमान बांधण्यासाठी ११ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रस्ताव दिला आहे. दोन्ही गटांचे प्रस्ताव समितीसमोर शुक्रवारी आले होते. यावेळी दोन्ही प्रस्ताव परत ग्रामपंचायतीकडे पाठविण्याचा निर्णय झाला.

रस्त्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार
जिल्हा परिषदेकडील रस्त्यांना निधी मिळत नाही. यामुळे हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची मागणी सदस्य सुरेश मोहिते यांनी केली. कडेगाव तालुक्यातील सहा रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचे ठरले. भाऊसाहेब पाटील म्हणाले की, विशेष रस्ते दुरुस्तीसाठी ३६ कामांसाठी तीन कोटी १९ लाखाचा निधी मंजूर आहे. खानापूर तालुक्यातील बारा रस्त्यांच्या कामासाठी आठ कोटी ११ लाख आणि तासगाव तालुक्यातील सात कामांसाठी चार कोटी ९९ लाख मंजूर आहेत. दोन्ही गटांचे प्रस्ताव समितीसमोर शुक्रवारी आले होते. यावेळी दोन्ही प्रस्ताव परत ग्रामपंचायतीकडे पाठविण्याचा निर्णय झाला.

Web Title: Order to be removed from the bricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.