‘एलसीबी’ला पर्यायी यंत्रणा
By Admin | Updated: June 3, 2015 01:02 IST2015-06-03T00:18:28+5:302015-06-03T01:02:32+5:30
मनोजकुमार शर्मा : गुन्हे नियंत्रणासाठी उचलले पाऊल

‘एलसीबी’ला पर्यायी यंत्रणा
कोल्हापूर : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी व गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेबरोबर (एल.सी.बी.) आता पर्यायी यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
डॉ. शर्मा म्हणाले, पोलीस दलातील गुन्हे प्रकटीकरणासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा हे पोलीस दलाचे मूलभूत अंग आहे. जिल्ह्यात कोठेही अवैध धंद्यांवर धाडी टाकण्याचे त्यांना सर्वाधिकार असतात. त्यामुळे या शाखेसाठी अनेक पोलीस अधिकाऱ्यांची धडपड असते. ही शाखा कोणतीही कारवाई सुरुवातीला मोठ्या जोमाने करते; पण कालांतराने तिला मरगळ येते. ‘एलसीबी’मध्ये यापूर्वी एक-एक पोलीस कर्मचारी सात ते आठ वर्षे ठाण मांडून असायचा. या कर्मचाऱ्याने एखादा गुन्हा उघडकीस आणायचे ठरविले तर शाखेमधील सर्व कर्मचारी कामाला लागत असत. त्या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन तो उघडकीस आणत होते; पण आता मरगळ झटकण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेबरोबर पोलीस दलाने पर्यायी यंत्रणा उभी करण्यास सुरुवात केली आहे. या यंत्रणेत पोलीस दलातील अनुभवी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. मटका, जुगार, तसेच गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी यांचा उपयोग होणार आहे.
‘एलसीबी’ म्हणजे...
पोलीस दलातील एलसीबी विभाग म्हणजे पूर्वी ‘सोन्याची अंडे देणारी कोंबडी’ असे समजले जात होते. आता पोलिसांसमोर गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आव्हान आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे काम चांगले आहे, त्यांनाच ‘एलसीबी’त जागा, असे सूत्र आहे.
निरीक्षकांसमोर आव्हान
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. त्यामुळे मोहिते यांच्यासमोर गुन्हे प्रकटीकरणाचे आव्हान असणार आहे.