पॅनेलच्या एकत्रिकरणासाठी आशावादी : जयंत पाटील
By Admin | Updated: April 17, 2015 00:04 IST2015-04-16T23:45:59+5:302015-04-17T00:04:36+5:30
जिल्हा बँक निवडणूक

पॅनेलच्या एकत्रिकरणासाठी आशावादी : जयंत पाटील
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकत्रिकरणाबाबत प्रयत्न सुरू आहेत. पक्षीय प्राबल्यानुसारच जागावाटप होणार असल्याने एकत्रिकरणाच्या प्रयत्नांना यश मिळेल, अशी आशा आहे. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी येत्या दोन दिवसात चर्चा केली जाईल, अशी माहिती माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती बँकेबाबत सर्व पक्षांनी एकत्र यावे, अशी आमची भावना आहे. काही नेत्यांशी याबाबत प्राथमिक चर्चा झालेली आहे. काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी काय मागणी केली याची मला कल्पना नाही, तरीही कार्यकर्ते म्हणून ते त्यांची भावना व्यक्त करणारच. त्यात चुकीचे काही नाही.
शनिवारी, १८ एप्रिल रोजी आम्ही सर्वपक्षीय नेते एकत्रित येऊन चर्चा करू. जागावाटप हे त्या-त्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे होईल. कोणाचीही जागा कमी-जास्त होणार नाही. तरीही सर्वपक्षीय नेत्यांच्या चर्चेत यावर निश्चितपणे एकमत होईल, अशी आशा आहे. जागावाटप निश्चित झाल्यानंतर उमेदवारीविषयी निर्णय घेतला जाईल. उमेदवार निश्चित करुन त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल.
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाबाबत आताच चर्चा करणार नाही. विलासराव शिंदे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याजागी सक्षम माणूस मिळायला हवा. जिल्हा बँक संचालक पद व पक्षीय अध्यक्ष पदाबाबत कोणताही वाद नाही. सामंजस्याने आणि विचारपूर्वक निर्णय घेतले जातील. पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा निर्णय नंतर घेतला जाईल. (प्रतिनिधी)