कारागृह उभारण्यास कवलापूरकरांचा विरोध
By Admin | Updated: August 12, 2015 23:25 IST2015-08-12T23:25:46+5:302015-08-12T23:25:46+5:30
पोलीस ठाणे सुरू करा : प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयासही हरकत नाही

कारागृह उभारण्यास कवलापूरकरांचा विरोध
बुधगाव : कवलापूर (ता. मिरज) येथील विमानतळाच्या जागेवर जिल्हा कारागृह उभारण्यास कवलापूरमधील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. कारागृहाऐवजी येथे सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय व इतर कार्यालये उभारावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत येत्या स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभेत ठराव करण्यात येणार आहे.
सरपंच प्रकाश माळी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष भानुदास पाटील, वसंतदादा साखर कारखाना संचालक निवासबापू पाटील, माजी सरपंच विजय पाटील आदींनी याबाबतची भूमिका मांडली आहे.
सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक बनलेले सांगलीतील जिल्हा कारागृह कवलापूर येथील विमानतळावरील जागेत हलविण्याचा विचार राज्याच्या कारागृह विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी मागील आठवड्यात सांगली दौऱ्यात व्यक्त केला होता. कारागृहासाठी कवलापूर विमानतळावरील दहा एकर जागा वर्ग करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
मात्र मीरा बोरवणकर यांच्या या निर्णयाला कवलापूरमधील लोकप्रतिनिधी अािण ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यावेळी राजेंद्र माळी, सुभाष जाधव, प्रमोद पाटील, अनिल खाडे, संजय तोडकर, जयंत पाटील आदी यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
उद्योग उभारणीच्या मागण्यांकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष
कवलापूर विमानतळाची सुमारे १५० एकर जागा सध्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे आहे. विमानतळ उभारणीचे अनेक नारळ फुटूनही अपुऱ्या जागेमुळे विमानतळ उभारणीचा प्रयत्नच सोडून द्यावा लागला आहे. स्थानिक तरूणांना नोकरी - उद्योगाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून येथे एम. आय. डी. सी. उभारण्याची मागणीही स्थानिकांनी वारंवार शासनाकडे केली. परंतु, याकडे राज्यकर्त्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.