निकृष्ट विकास कामांवर विरोधक अजूनही गप्पच
By Admin | Updated: February 9, 2015 23:56 IST2015-02-09T23:49:11+5:302015-02-09T23:56:45+5:30
इस्लामपूर नगरपालिका : वैभव पवार यांचा एकाकी लढा

निकृष्ट विकास कामांवर विरोधक अजूनही गप्पच
अशोक पाटील - इस्लामपूर - भुयारी गटार, सुंदर बगीचा, भव्य सुशोभित रस्ते, २४ तास शुध्द आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा, झोपडपट्टी पुनर्वसन, वृक्षारोपणसारख्या योजना राबविण्यात इस्लामपूर नगरपरिषद आघाडीवर आहे. शासनाच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपये पालिकेकडून खर्ची टाकले जात आहेत. झालेली कामे आणि शहरात होत असलेले रस्ते निकृष्ट असल्याने काँग्रेसचे माजी नगरसेवक वैभव पवार आक्रमक झाले आहेत. त्यांच्या या भूमिकेवर विरोधी नगरसेवक विजय कुंभार, आनंदराव पवार, कपिल ओसवाल यांनी मौन पाळले आहे.
इस्लामपूर शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे स्वप्न माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचे आहे. यासाठी त्यांनी सत्तेत असताना कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचा पोहण्याचा तलाव, सुंदर बगीचा, प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे, नाट्यगृह, खुले नाट्यगृह, घरकुल योजना, अद्ययावत न्यायालयाची इमारत आदी विकासकामे झाली आहेत. परंतु यातील काही कामे वगळता सर्वच कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे वेळोवेळी आरोप झाले आहेत. शहराला २४ तास पाणी देण्याची सत्ताधाऱ्यांची घोषणा हवेत विरली आहे. शहराच्या उपनगरांना पुरेसे पाणीही मिळत नाही, मग २४ तास पाणी कोठून देणार?, असाही प्रश्न उपस्थित होतो.
सध्या शहरात रस्ते करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. एका तासात रस्ता बनविण्याचे तंत्र पालिकेच्या ठेकेदाराने अवगत केले आहे. यामुळे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्टपणे होत आहे. सलग दोन दिवस हे काम काँग्रेसचे माजी नगरसेवक वैभव पवार यांनी बंद पाडले. यावेळी विरोधी नगरसेवक विजय कुंभार, आनंदराव पवार, कपिल ओसवाल यांनी पवार यांना पाठिंबा देणे गरजेचे असतानाही ते मौन पाळून आहेत.
सध्या शहरात राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रम पाटील, जयकर पाटील यांच्यासह शिवसेनेचे नेते कार्यरत आहेत. तेही वैभव पवार यांच्या मदतीला आले नाहीत.
हे सर्वच नेते सत्ताधाऱ्याऱ्याच्या विरोधात एकाकी लढत असल्याने कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळेच पालिकेने ‘निकृष्ट दर्जा’ हे ब्रीद तयार करून आपली वाटचाल ठेवली आहे.
सध्या इस्लापूर शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. भविष्यात भुयारी गटार योजना अमलात आणावयाची आहे.
त्यामुळे पुन्हा रस्ते खोदले जाणार आहेत. त्यामुळेच सध्या रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. त्याचा दर्जा तज्ज्ञांकडून तपासून घेऊन विरोधकांनी आरोप करावेत.
-विजय पाटील,
पक्षप्रतोद, इस्लामपूर पालिका
सध्या शहरात राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रम पाटील, जयकर पाटील यांच्यासह शिवसेनेचे नेते कार्यरत आहेत. तेही वैभव पवार यांच्या मदतीला आले नाहीत. हे सर्वच नेते सत्ताधाऱ्यांविरोधात एकाकी लढत असल्याने कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळेच पालिकेने ‘निकृष्ट दर्जा’ हे ब्रीद तयार करून आपली वाटचाल चालू ठेवली आहे.
सध्या रस्त्याचे काम १ इंच जाडीचे कारपेट धरून केले जात आहे. हे रस्ते येणाऱ्या पावसाळ्यातच नेस्तनाबूत होणार आहेत. रस्त्याच्या खर्चाचे बजेट अत्यल्प असल्याने तक्रारी करूनही उपयोग होणार नाही. यापूर्वी सर्वसामान्यांना खाचखळग्यातून चालावे लागत होते. त्यापेक्षा हे रस्ते बरे म्हणायचे.
- वैभव पवार,
माजी नगरसेवक, काँग्रेस