शासनाच्या जागा केल्या खुल्या
By Admin | Updated: January 13, 2016 23:17 IST2016-01-13T23:17:44+5:302016-01-13T23:17:44+5:30
संजयनगरमध्ये कारवाई : अतिक्रमण पथकाने पाच खोकी हटविली

शासनाच्या जागा केल्या खुल्या
सांगली : शहरातील संजयनगर येथील राज्य शासनाच्या १३.३६ गुंठे जागेवर केलेले अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने बुधवारी उद्ध्वस्त केले. या जागेवर तिघांनी पत्र्याचे शेड मारून रुग्णालय, अंगणवाडी, वेल्डिंग वर्कशॉप सुरू केले होते. याच परिसरातील शंभरफुटी रस्त्यावरील पाच खोकीही हटविण्यात आली.
संजयनगर येथील जगदाळे प्लॉटमधील साठफुटी रस्त्यालगत अर्बन लँड सिलिंगमधील १३.३६ गुंठे जागा राज्य शासनाच्या नावावर आहे. या जागेसंदर्भात मालक व शासनात न्यायालयीन दावाही सुरू आहे. शासनाचे नाव लागले असले तरी, मूळ मालकाला नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे मूळ मालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पण न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली नाही. त्यात नगरसेवक सुनील कलकुटगी यांनी, या जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. पण याची त्यांनी दखल न घेतल्याने कलकुटगी यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार केली. नगरविकासच्या कक्ष अधिकाऱ्यांनी शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी महापालिकेच्या पथकाला अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. पालिकेचे सहायक आयुक्त रमेश वाघमारे, अभियंता आप्पा हलकुडे, नगररचनाचे संजय कांबळे यांच्या पथकाने दुपारी शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या जागेवर एकाने रुग्णालय सुरू केले होते. त्याच्याशेजारीच अंगणवाडी व वेल्डिंगचे वर्कशॉप होते. बाजूच्या एका प्लॉटमध्ये पत्र्याचे शेड उभारले होते. त्यानंतर या पथकाने संजयनगर शंभरफुटी रस्त्यावरील बीएसएनएलजवळील खोक्यांवर कारवाई केली.
या ठिकाणी नव्याने खोकी उभारण्यात आली होती. या कारवाईला खोकीधारकांनी सुरूवातीला विरोध केला. नोटीस न देता खोकी हटवू नका, अशी भूमिका घेतली. पण अधिकाऱ्यांनी, खोकी उभारताना पालिकेची परवानगी घेतली होती का? आता कशाला नोटीस हवी? असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर त्याठिकाणची पाच खोकी हटविण्यात आली. अजूनही या रस्त्यावर ५० खोकी असून तीही हटविण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
धनदांडग्यांची अतिक्रमणे हटवा : संभाजी पवार
शहरात अनेक धनदांडग्यांनी रस्त्यावर बंगले, शोरूम, दुकाने थाटली आहेत. त्यांचे अतिक्रमण हटविण्याचे धाडस प्रशासनाने दाखवावे. मग गोरगरिबांवर हातोडा टाकावा. सध्याची अतिक्रमण हटाव मोहीम राजकीय दबावाने सुरू आहे. त्याबद्दल जनतेत असंतोष आहे. प्रशासनाने आधी हातगाडी, फेरीवाले, विक्रेते यांचे पुनवर्सन करावे, त्यांना नोटिसा द्याव्यात, मगच कारवाई करावी, अन्यथा त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन उभे करावे लागले, असा इशारा माजी आमदार संभाजी पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.