सोशल मीडियावरील लिंक उघडणे ठरू शकते धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST2021-04-18T04:26:30+5:302021-04-18T04:26:30+5:30
सांगली : गेल्या दोन दिवसांपासून व्हॉट्सॲपवर विविध ओटीटी प्लॅटफॉर्मच्या नावाने येत असलेल्या लिंक उघडल्यास धोका निर्माण होऊ शकतो. आपल्या ...

सोशल मीडियावरील लिंक उघडणे ठरू शकते धोकादायक
सांगली : गेल्या दोन दिवसांपासून व्हॉट्सॲपवर विविध ओटीटी प्लॅटफॉर्मच्या नावाने येत असलेल्या लिंक उघडल्यास धोका निर्माण होऊ शकतो. आपल्या मोबाइलमधील सर्व डाटा लीक होण्याबरोबरच मोबाइललाही नुकसान पाेहोचण्याची शक्यता असल्याने अशा लिंक कोणीही उघडू नयेत, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याच्यावतीने करण्यात आले आहे.
गेल्या दाेन दिवसांपासून व्हॉट्सॲपवर लिंक ओपन करा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे वर्षभराचे नोंदणी मोफत मिळवण्याचे संदेश फिरत आहेत. यात काही लॉटरी पध्दतीचे संदेश आहेत तर बहुतांश संदेश हे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंपन्यांचे शुल्क मोफत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासह ऑनलाइन सिनेमा पाहण्याबाबतही आमिष दाखविण्यात आले आहे. मुळात कोणत्याही कंपनीकडून अशी योजना करण्यात आली नाही. तरीही असे संदेश येत आहेत. अनेक जण केवल उत्सुकतेपोटी ही लिंक उघडत आहेत. मात्र, यामुळे मोबाइलमधील वैयक्तिक डेटा, संपर्क क्रमांक व इतर गोपनीय माहिती सायबर हॅकरपर्यंत पोहोचू शकते, त्यामुळे अशा लिंक कोणीही उघडू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
चुकून लिंक उघडली असल्यास त्यापासून संरक्षणासाठी ‘सायबर’कडून पर्यायही देण्यात आला आहे. त्यानुसार मोबाइलमध्ये लिंक उघडली गेली असल्यास मोबाइलमधील ॲप मॅनेजरमध्ये जावे तिथून ऑनलाइन स्ट्रीम ॲप्स हा पर्याय निवडावा, त्यात क्लीअर कॅशे करून क्लीअर डाटा ॲप्स मॅनेजर करत फोर्स स्टॉप हा पर्याय निवडून हे ॲप अन्इंस्टॉल करावे. अशी माहितीही ‘सायबर’ पोलीस ठाण्याच्यावतीने देण्यात आली आहे.