‘सिव्हिल’ सुसज्जतेचा मार्ग मोकळा!
By Admin | Updated: January 15, 2016 00:16 IST2016-01-14T22:25:12+5:302016-01-15T00:16:20+5:30
आरोग्यमंत्री सांगलीत : नव्या ‘ओपीडी’च्या बांधकामाचे आज होणार भूमिपूजन

‘सिव्हिल’ सुसज्जतेचा मार्ग मोकळा!
सचिन लाड --सांगली -गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल) नव्या ‘ओपीडी’च्या बांधकामाचे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शुक्रवारी भूमिपूजन होत आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनाचा कार्यक्रम दुसऱ्यांदा होत असला, तरी या ‘ओपीडी’त सर्व सुविधा मिळणार असल्याने रुग्णालय सुसज्जतेचा मार्ग मोकळा झाला आहे.
तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावीत यांच्याहस्ते दोन वर्षांपूर्वी ओपीडी इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र प्रशासकीय मंजुरीअभावी तेव्हापासून फाईल पडून होती. मंजुरी नसल्याने सुमारे १८ कोटींचा निधी पडून होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने आॅक्टोबर महिन्यात या कामाची निविदा प्रसिद्ध केली होती. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांनी शासनाने मंजूर केलेला १८ कोटींचा हा निधी मिरज रुग्णालयासाठी असल्याचा कांगावा करून नवीन ओपीडी बांधण्यास विरोध केला होता. त्यामुळे वर्षभर हे काम रखडले होते. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी याप्रश्नी रुग्णालयात भेट दिली. त्यावेळी डॉ. डोणगावकर यांनी ओपीडीचे बांधकाम सुरू केले जाईल, असे सांगितले. पण त्यानंतर पडद्याआड राहून डोणगावकर यांचा विरोध राहिला. राज्यात सत्ता असूनही जिल्ह्यातील खासदार व आमदारांना यासाठी फार झगडावे लागले. अखेर वैद्यकीय शिक्षणमंत्री तावडे यांना मध्यस्थी करावी लागली. या विषयावर मुंबईत बैठक झाली. त्यानंतर खऱ्याअर्थाने ओपीडी बांधकामाची प्रक्रिया सुरू झाली.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता तावडे यांच्या प्रमुख उपस्थिीतीत ओपीडीच्या बांधकामाचे भूमिपूजन होत आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत. नव्या ओपीडीच्या दोन इमारती असणार आहेत. यामध्ये दोन मजली रक्तपेढी असून, स्ट्रेचर रॅम्प तयार केला जाणार आहे. एमआरआय, सिटी स्कॅन व कलर एक्सरे, डॉक्टरांना मार्गदर्शन केंद्र, डोळे तपासणी, क्षयरोग कक्ष, त्वचारोग, लहान मुलांचा कक्ष, भूल कक्ष, दंत तपासणी, एआरटी सेंटर, प्रशासकीय कार्यालय, वैद्यकीय रेकॉर्ड कक्ष, लहान मुलांवर शस्त्रक्रिया, नाक-कान-घसा तपासणी, परिचारिका कक्ष आदी विभागांचा त्यात समावेश आहे. यामध्ये अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
रुग्णालयाच्या स्थापनेपासून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच सुविधा मिळत आहेत. तावडे पहिल्यांदाच रुग्णालयात येत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम सुरू आहे.
आर्थिक संकट : तावडे मदत करणार?
सांगलीच्या शासकीय रुग्णालयाचा पश्चिम महाराष्ट्रात लौकिक आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा व कर्नाटकातील रुग्ण येथे दररोज औषधोपचारासाठी दाखल होतात. पण गेल्या आठ वर्षांपासून सांगलीचे शासकीय रुग्णालय आर्थिक संकटात आहे. वर्षासाठी केवळ दोन कोटींचा निधी मिळत आहे. या निधीवर औषधांपासून ते कार्यालयीन स्टेशनरी खर्च भागवावा लागत आहे. औषधांची टंचाई सातत्याने भासत आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यासाठी चिठ्ठी दिली जात आहे. शासनाकडून अनुदानात वाढ करून ती वेळेवर दिली, तर रुग्णालयाचा कारभार आणखी चांगल्याप्रकारे चालू शकतो. याशिवाय सांगली आणि मिरज या दोन्ही रुग्णालयांची संलग्नता कायम ठेवण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. तावडे प्रथमच रुग्णालयात येत असल्याने ते रुग्णालयासाठी काय-काय देण्याची घोषणा करणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
‘लोकमत’चा सातत्याने पाठपुरावा
सांगली शासकीय रुग्णालयातील नव्या ओपीडीच्या रखडलेल्या कामावर ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रकाशझोत टाकला. त्यानंतर सातत्याने या विषयावर होणाऱ्या घडामोडींचे वृत्त प्रसिद्ध केले. सांगलीतील काही संघटनांनीही वृत्ताच्या आधारे पाठपुरावा केला होता.