शिराळ्यात काेराेनाबाधित रुग्णांचा बाजारपेठेत खुलेआम वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:24 IST2021-04-05T04:24:12+5:302021-04-05T04:24:12+5:30
शिराळा : शहरासह तालुक्यातील होम आयसोलेशनमधील कोरोना रुग्णांचा बाजारपेठेत खुलेआम वावर आणि बाजारपेठेत होणारी नागरिकांची गर्दी यामुळे तालुक्यात ...

शिराळ्यात काेराेनाबाधित रुग्णांचा बाजारपेठेत खुलेआम वावर
शिराळा : शहरासह तालुक्यातील होम आयसोलेशनमधील कोरोना रुग्णांचा बाजारपेठेत खुलेआम वावर आणि बाजारपेठेत होणारी नागरिकांची गर्दी यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सध्या काही कोरोना रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. यातील काहींना कोणतेही लक्षण नाहीत तर काहींना किरकोळ लक्षणे दिसून येत आहेत. गतवेळी कोरोना रुग्ण आढळल्यास तो विभाग अथवा परिसरात रस्ते बंद करण्यात येत हाेते, घरावर फलक लावले जायचे. मात्र सध्या नियम बदलले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण कोण आहे, कोठे आहे याची माहिती समजून येत नाही. याचा गैरफायदा काही रुग्ण घेत आहेत. हे रुग्ण उघडपणे गावामध्ये खरेदीसाठी फिरत आहेत.
लॉकडाऊनच्या भीतीपोटी मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. तसेच मुंबई, पुणे येथूनही लाेक येत आहेत. तालुक्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा ठरू शकते. यामुळे प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेऊन शहरात फिरणाऱ्या कोरोनाबाधितांवर कडक कारवाई करावी तसेच इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना संस्था विलगीकरण कक्षात ठेवणे, अँटिजेन टेस्ट बंधनकारक कराव्यात, अशी मागणी होत आहे.