इस्लामपुरात पारधी समाजाचा प्रांत कार्यालयावर उघडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST2021-02-10T04:27:05+5:302021-02-10T04:27:05+5:30
इस्लामपूर : मला घर द्या, मला जागा-जमीन द्या, मला शिकायचं आहे, आम्हाला हक्क द्या अशा घोषणा उघड्या अंगावर लिहून ...

इस्लामपुरात पारधी समाजाचा प्रांत कार्यालयावर उघडा मोर्चा
इस्लामपूर : मला घर द्या, मला जागा-जमीन द्या, मला शिकायचं आहे, आम्हाला हक्क द्या अशा घोषणा उघड्या अंगावर लिहून दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्यावतीने प्रशासनाच्या नावाने शंखध्वनी करत प्रांताधिकारी कार्यालयावर उघडा मोर्चा काढून राहुटी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
अभियानाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून पारधी समाजाचा हा उघडा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आला.
यावेळी प्रा. वायदंडे म्हणाले, पारधी समाजाला खरेखुरे स्वातंत्र्य मिळालेले नाही. भारतीय नागरिकत्व दिलेले नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आजही त्यांचे संपूर्ण पुनर्वसन झालेले नाही. त्यांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत हे राहुटी आंदोलन सुरूच राहणार आहे.
प्रांताधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत नायब तहसीलदार सुनील चव्हाण, शिरस्तेदार महादेव पाटील यांनी लेखी आश्वासन दिले. मात्र हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. मोर्चात पोपट लोंढे, सुधाकर वायदंडे, उत्तमराव मोहिते, निर्मला पवार, भारती शिंदे, जितेंद्र काळे, टारझन पवार, कारकुन्या पवार, रोषणा पवार, मालन पवार, गुलछडी काळे, जागृती पवार, टिकल पवार, इंद्रजित काळे, जहॉँगीर पवार उपस्थित होते.
फोटो - ०९०२२०२१-आयएसएलएम- पारधी मोर्चा न्यूज
इस्लामपूर येथे दलित महासंघाच्या पारधी हक्क अभियानाच्यावतीने उघडा मोर्चा काढण्यात आला.