उघड्यावर शौचास बसणारे डिजिटलवर
By Admin | Updated: November 9, 2016 01:19 IST2016-11-09T01:19:33+5:302016-11-09T01:19:33+5:30
रवींद्र खेबूडकर : महिलांसाठी २७ ठिकाणी नवीन स्वच्छतागृहे

उघड्यावर शौचास बसणारे डिजिटलवर
सांगली : महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त करण्यासाठी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची यादी त्यांच्या मोबाईल नंबरसह तयार करण्यात आली असून, काहींची छायाचित्रेही घेण्यात आली आहेत. अशा लोकांशी आरोग्य विभागाकडील कर्मचारी संपर्क साधून त्यांचे प्रबोधन करतील. त्यानंतरही ते उघड्यावर शौचास बसल्यास त्यांची नावे छायाचित्रासह डिजिटलवर झळकविली जातील, असे खेबूडकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
डिसेंबरअखेर महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त करण्याचा विडा आयुक्त खेबूडकर यांनी उचलला आहे. आजअखेर १७ प्रभाग हागणदारीमुक्त झाले आहेत. उर्वरित प्रभागांसाठी त्यांनी नियोजन केले आहे. प्रत्येक प्रभागनिहाय नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेली स्वच्छतागृहे दुरूस्त करण्यापासून ते नव्याने काही स्वच्छतागृहे बांधण्यापर्यंत आयुक्तांनी नियोजन केले आहे. काही ठिकाणी मोबाईल शौचालयाची संकल्पनाही राबविली जाणार आहे. विशेषत: महिलांसाठी नवीन २७ ठिकाणी शौचालये बांधली जाणार आहेत. त्याचा सर्व्हे उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला अधिकाऱ्यांच्या पथकाने केला आहे.
याबाबत आयुक्त खेबूडकर म्हणाले की, उपायुक्त सुनील पवार व स्मृती पाटील यांच्यासह मुख्य लेखापरीक्षक संजय गोसावी यांनी स्वच्छतागृहांचा सर्व्हे केला आहे. त्यातील ५० स्वच्छतागृहांची दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यासाठी अंदाजे ७५ लाख रुपये खर्च होईल. ही दुरुस्ती झाल्यास १० ते १२ प्रभाग हागणदारीमुक्त होणार आहेत. महिला अधिकाऱ्यांनी महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी २७ जागा निश्चित केल्या आहेत. उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांचे दूरध्वनी क्रमांकही प्राप्त झाले आहेत. त्यांना वारंवार दूरध्वनीवरून सूचना दिल्या जातील. तरीही त्यांनी उघड्यावर शौचास जाण्याचे थांबविले नाही, तर त्यांची नावे डिजिटलवर प्रसिद्ध केली जातील. काही लोकांची छायाचित्रेही आरोग्य पथकाने काढली आहेत. त्यांची छायाचित्रेही प्रसिद्ध करू.
औद्योगिक वसाहतीतील काही उद्योजक रेडिमेड शौचालय तयार करीत आहेत. त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, रेडिमेड शौचालयेही काही ठिकाणी बसविली जातील. तसेच पालिका हद्दीतील २२१ जणांनी शौचालयाचे अनुदान घेऊनही अद्याप ते बांधलेले नाही. त्यांच्यावरही कारवाईचा विचार सुरू असल्याचे खेबूडकर म्हणाले. (प्रतिनिधी)
हरिपूरचे लोक सांगली हद्दीत
हरिपूर रोडचा परिसर हागणदारीमुक्त आहे. या भागातील पालिका हद्दीत लोक उघड्यावर शौचास जात नाहीत. पण हरिपूर हद्दीतील लोक मात्र पालिका हद्दीत शौचास येत आहेत. याबाबत महापालिकेच्यावतीने हरिपूर ग्रामपंचायतीला पत्रव्यवहारही करणार आहोत, असे आयुक्तांनी सांगितले. सांगलीतील एका प्रभागात केवळ दोनच व्यक्ती उघड्यावर शौचास जातात. त्यापैकी एकाकडे शौचालय आहे, पण दोघेही मित्र असल्याने शौचालय असलेला व्यक्ती मित्रासोबत जातो, असा किस्साही आयुक्तांनी सांंगितला.