ओपीडीतील डॉक्टर दुपारनंतर गायब
By Admin | Updated: July 26, 2015 00:16 IST2015-07-26T00:10:38+5:302015-07-26T00:16:45+5:30
नागरिकांतून संताप : महापालिका रुग्णालयातील अवस्था

ओपीडीतील डॉक्टर दुपारनंतर गायब
संजयनगर : सांगली शहरातील उत्तर शिवाजीनगर, वडर कॉलनी येथील महापालिका रुग्णालय क्र. ७ मध्ये दुपारनंतर औषध निर्माता व डॉक्टर गायब असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयास दुपारच्यावेळी भेट दिली असता, डॉक्टर उपस्थित नसल्याचे दिसून आले.
दुपारनंतर रुग्णालयास कुलूप होते. याकडे मात्र आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सांगली शहरात वडर कॉलनीत महापालिका रुग्णालय क्र. ७ गेल्या अनेक दिवसांपासून अस्तिवात आहे. या ठिकाणी जनरल तपासणी, त्वचारोग तपासणी, टीबी रुग्ण तपासणी व इतर तपासणी व उपचार केले जातात. या ओपीडीचे वेळापत्रक सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ४ ते ६ असे आहे. परंतु सकाळी ८ ची वेळ डॉक्टरांची असताना ते ९ वाजता कामावर येतात व ओपीडीत ९ ते ११ या वेळेत काम करतात. दुपारी ४ ते ६ नंतर या ओपीडीला कुलूपच असते. या ठिकाणी असलेले औषध निर्माता व डॉक्टर दुपारनंतर कामावरच येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या ठिकाणी असलेल्या ओपीडीला भेट दिली असता ती बंद होती. स्थानिक नगरसेवक व महापालिका आरोग्य विभागाचे याकडे लक्ष नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्वरित ओपीडी सुरळीत सुरू करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)