अवघ्या अडीच दिवसांच्या पावसाने केले परागंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST2021-07-27T04:27:28+5:302021-07-27T04:27:28+5:30
फोटो २६ संतोष ०१ गावभागातील दीपक शिकलगार यांच्या अख्खे कुटुंब पूरग्रस्त झाले आहे. दामाणी हायस्कूलमधील निवारा केंद्रात थांबून पूर ...

अवघ्या अडीच दिवसांच्या पावसाने केले परागंदा
फोटो २६ संतोष ०१
गावभागातील दीपक शिकलगार यांच्या अख्खे कुटुंब पूरग्रस्त झाले आहे. दामाणी हायस्कूलमधील निवारा केंद्रात थांबून पूर ओसरण्याची वाट ते पाहत आहेत.
फोटो २६ संतोष ०२
मदनभाऊ पाटील युवामंचाने रहिवाशांची जेवणाची सोय केली असली, तरी लहानग्यांसाठी स्वयंपाकही खोलीतच केला जात आहे.
फोटो २६ दीपक शिकलगार
संतोष भिसे- लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील २६ निवारा केंद्रांमध्ये तीन हजार विस्थापितांनी आश्रय घेतला आहे. कृष्णेला कधी एकदा उतार मिळतो आणि आपापल्या घरात परततो, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
अवघ्या अडीच दिवसांच्या पावसाने या लोकांना अक्षरश: परागंदा केले आहे. २०१९च्या महापुराचा अनुभव आणि प्रशासनाचा ५२ फूट पाणीपातळीचा अंदाज यामुळे त्यांनी वेळीच घरे सोडली, पण सततच्या पुराने सहनशीलतेच्या भिंती खचल्या आहेत. कृष्णामाई घरात मुक्कामाला आल्याने निवारा केंद्रांत आश्रय घ्यावा लागला. चार दिवसांपासून चार हजारांहून अधिक नागरिक दिवाभिताचे जीणे जगत आहेत. महापालिका व स्वयंसेवी संस्थांनी खाण्यापिण्यासह सर्व सोयी केल्या असल्या, तरी घरात परतण्याची प्रतीक्षा आहे.
गावभागातील दीपक शिकलगारांनी संपूर्ण कुटुंबासह दामाणी हायस्कूलमध्ये आश्रय घेतला आहे. शनिवारी सकाळीच त्यांनी घराला कुलूप ठोकले. पुराचा अंदाज घेऊन महत्त्वाचे साहित्य माळ्यावर हलविले. कर्नाळ रस्त्यावरील हर्ष रजपूत महापालिकेच्या शाळा क्रमांक १४ मध्ये कुटुंबासह राहतोय. पत्र्याच्या पेट्यांत सगळा संसार भरून आणला आहे. निवारा केंद्रात सोयी असल्या, तरी पुरात घर शाबूत राहील का नाही, याची चिंता लागली आहे.
श्यामरावनगरमधील जनाब बादशाह खलिफा मदरशात काम करतात. महापुराचा तिसऱ्यांदा कटू अनुभव त्यांनी घेतलाय. कोरोनामुळे मदरसा रिकामा असला, तरी होणाऱ्या नुकसानीची चिंता त्यांना भेडसावतेय. श्यामरावगरमधील घर विकून आता सुरक्षित परिसरात जागा घेणार असल्याचे सांगितले. हरिपूर रस्त्यावर काळी वाट परिसरातील दीपक वैद्य यांनाही कुटुंबासह परागंदा व्हावे लागले आहे. मदनभाऊ पाटील युवामंचाने प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र खोली दिली आहेत, पण स्वच्छतागृहे पुरेशी नाहीत.
चौकट
पोटातल्या बाळासह घर सोडले
श्यामरावनगरमधील चार गर्भवतींना कुटुंबासह घर सोडावेे लागले. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून त्यांना गोळ्या-अैाषधे दिली जात आहेत. गावभागातील अंथरुणाला खिळलेल्या एका वृद्धाला तरुणांनी झोळी करून, दामाणी हायस्कूलमधील निवारा केंद्रात आणले. त्यांना आणखी चांगल्या उपचारांची गरज होती, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा असल्याने वृद्धाला तात्पुरते उपचारच मिळाले.
चौकट
जनावरांच्या पोटापाण्याचीही चिंता
विस्तारित भागातील रहिवाशांसोबत जनावरेही मोठ्या संख्येने आहेत. माणसांच्या पोटापाण्याची सोय होत असली, तरी जनावरांच्या वैरणीसाठी धावाधाव करावी लागत आहे. महापालिकेने वैरण उपलब्ध करून दिल्याने दिलासा मिळाला आहे.
चौकट
पुढचा पावसाळा दाखवतोय वाकुल्या
लोकांच्या नजरेपुढे पुढचा पावसाळा आहे, किंबहुना, परतीचा पाऊसही आतापासूनच वाकुल्या दाखवत आहे. हे किती दिवस चालणार, हा प्रश्न पूरग्रस्तांसमोर आहे.