इस्लामपूरच्या नगराध्यक्षांकडून केवळ स्टंटबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:04+5:302021-05-22T04:25:04+5:30
इस्लामपूर : येथे नगराध्यक्षांकडून सभागृहाचे पावित्र्य जपले जात नाही. बेजबाबदारपणे बोलून स्टंटबाजी करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी ...

इस्लामपूरच्या नगराध्यक्षांकडून केवळ स्टंटबाजी
इस्लामपूर : येथे नगराध्यक्षांकडून सभागृहाचे पावित्र्य जपले जात नाही. बेजबाबदारपणे बोलून स्टंटबाजी करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी निशिकांत पाटील यांच्यावर केली. गेल्या सव्वावर्षांच्या काळात पालकमंत्री जयंत पाटील यांनी १३ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला गती दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह घेतलेल्या पत्रकार बैठकीत पाटील बोलत होते. पत्रकार परिषदेला सुरुवात होताच गटनेते संजय कोरे यांनी रुग्णालयात जाण्याचे कारण सांगत काढता पाय घेतला.
पाटील म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षांच्या काळात मागील सरकारकडून काही निधी न मिळाल्याने शहराच्या विकासाची गती मंदावली होती. मात्र जयंत पाटील यांनी आता शहराच्या विकासात लक्ष घातले आहे. वाॅर्डनिहाय बैठकातून नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून आलेल्या सूचना विचारात घेत त्यांनी रस्ते, गटार आणि पाणी व्यवस्थेसाठी १३ कोटी ४५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून होणाऱ्या १६ कामांसाठी आता पालिकेच्या ना हरकत पत्राची अथवा ठरावाची गरज भासणार नाही.
पाटील म्हणाले, जिल्हा विकास निधीतून वेगवेगळ्या कामांचे सुमारे १५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव होते. मात्र नगराध्यक्षांनी दुर्लक्ष केल्याने हे विषय मंजूर झाले नाहीत. डिसेंबरपासून आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. शेवटी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यानंतर ऑनलाईन बैठक झाली. त्यातही हे विषय प्रलंबित राहिले. हे विषय मंजूर झाले असते, तर आणखी १५ कोटींचा निधी मिळाला असता.
चिमण डांगे म्हणाले, आता निधी मिळायला सुरुवात झाली आहे. पुढच्या काळात राहिलेली विकासकामे पूर्ण करणार आहोत.
विश्वास डांगे, खंडेराव जाधव, प्रा. शामराव पाटील, बी. ए. पाटील, प्रा. अरुणादेवी पाटील, भगवान पाटील, सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, पीरअली पुणेकर, शंकर चव्हाण उपस्थित होते.
चौकट
अण्णा डांगे यांची फिरकी
पत्रकार बैठक डांगे यांच्या निवासस्थानी झाली. त्यावेळी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. पत्रकार बैठक संपल्यावर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे उपस्थित झाले. डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते वेळाने आले. त्यांनी सगळ्यांकडे बघत, ‘काय निवडणूक जवळ आली का?’ असा मिश्किल प्रश्न केल्यावर सगळे हास्यकल्लोळात बुडाले.