जिवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ ४०० रुपये दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST2021-05-22T04:24:24+5:302021-05-22T04:24:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : कोरोना रुग्णालयात डाॅक्टर, नर्स यांच्याबरोबरीने वाॅर्डबाॅय यांनाही जोखमीचे काम करावे लागत आहे. रुग्णांचे कपडे ...

Only Rs | जिवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ ४०० रुपये दाम

जिवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ ४०० रुपये दाम

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : कोरोना रुग्णालयात डाॅक्टर, नर्स यांच्याबरोबरीने वाॅर्डबाॅय यांनाही जोखमीचे काम करावे लागत आहे. रुग्णांचे कपडे बदलण्यापासून ते मृतदेह हाताळण्यापर्यंतची सारी जबाबदारी या वाॅर्डबाॅयवर असते. जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना केवळ ४०० रुपये दाम मिळत आहेत. त्यांच्या राहण्याची, खाण्याची कसलीही व्यवस्था नसताना हे कर्मचारी विनातक्रार आपले कर्तव्य बजाविताना दिसतात.

जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या लाखाच्यापुढे गेली आहे. त्यात एप्रिल महिन्यापासून रुग्ण संख्या वाढली आहे. तसेच कोरोना मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. दररोज जिल्ह्यात ३० हून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. रुग्णालयातील साफसफाईपासून ते मृतदेह हाताळण्यापर्यंतची कामे या कंत्राटी कर्मचाऱ्यांना करावी लागतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांशी थेट संपर्क येतो. स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेत जिवावर उदार होऊन हे कर्मचारी आपली जबाबदारी पार पडत आहेत. या जोखमीच्या कामासाठी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी १२ हजार म्हणजे दिवसाला केवळ ४०० रुपये वेतन दिले जाते. या अल्पवेतनावरही हे कर्मचारी कर्तव्य बजावित आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी संघर्ष सफाई कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

चौकट

पोट भरले एवढे पैसे द्या, नोकरीत कायमस्वरूपी घ्या

१. मृत्यूच्या दाढेत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळते. किमान पोट भरेल ए‌‌वढे तरी पैसे द्या, अशी त्यांची मागणी आहे.

२. शासकीय रुग्णालयातील रिक्त जागा भरण्याची घोषणा शासनाने केली आहे. या रिक्त जागांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार व्हावा.

३. स्वत:सह कुटुंबालाही जोखमीत टाकून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा विमा उतरविला जावा.

चौकट

काय असते काम?

कोरोना रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सफाईपासून ते मृतदेह हाताळण्यापर्यंतची कामे करावी लागतात. वाॅर्डात एखाद्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा काॅल येताच हे कर्मचारी सुरक्षासाधनासह तिथे जातात. मृतदेहाचे सॅनिटायझेशन करून ते तीनपदरी प्लास्टिकमध्ये गुंडाळून व्यवस्थित पॅकिंग करतात. तेथून हा मृतदेह मर्च्युरीत आणून ठेवतात.

चौकट

मृतदेहांचे पॅकिंग आणि शिफ्टिंग, तरीही कामाचे मोल नाही

कोट

कंत्राटी कर्मचारी म्हणून कोरोना रुग्णालयात काम करणे तसे जोखमीचे आहे. घरच्या लोकांची काळजी घ्यावी लागते. सध्याचा पगार तुटपुंजा आहे. त्यावर संसाराचा गाडा कसा हाकायचा प्रश्न आहे. त्यासाठी पगारात वाढ करून कायमस्वरूपी सेवेत घ्यावे. - वैभव कांबळे

कोट

महाविद्यालयात पदवीचे शिक्षण सुरू आहे, पण सध्या महाविद्यालये बंद असल्याने कोविड रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत आहे. मृतदेह हाताळण्याचे काम कठीण असल्याने शासनाने पगारात वाढ केली पाहिजे- सुधीर कांबळे

कोट

राज्य शासनाने शासकीय रुग्णालयातील रिक्त १०० टक्के जागा भरण्याची घोषणा केली आहे. या जागांवर कोविडच्या काळात जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार व्हावा - अमीन सय्यद.

कोट

इतकी मोठी जबाबदारी सांभाळूनही आमच्या कामाचे मूल्यमापन होत नाही. अगदीच कमी पगारावर काम करावे लागते. साप्ताहिक सुट्टीही मिळत नाही. शासनाने कायमस्वरूपी सेवेत घेण्याची आवश्यकता आहे. - बाबासाहेब कांबळे.

Web Title: Only Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.