जिल्ह्यात ११० गावांत एकच गणपती!
By Admin | Updated: September 18, 2015 23:10 IST2015-09-18T22:52:23+5:302015-09-18T23:10:22+5:30
संख्या घटली : ‘तंटामुक्ती’चे बक्षीस पटकाविल्यानंतर उपक्रमाचा विसर

जिल्ह्यात ११० गावांत एकच गणपती!
सचिन लाड -- सांगली जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा राबवित असलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यावर्षी अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील ७१९ पैकी केवळ ११० गावांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ बसविला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावांना या उपक्रमाचा विसर पडल्याने, संख्या घटल्याचे चित्र आहे. पोलिसांनी प्रयत्न करुनही गावे या उपक्रमात सहभागी होत नाहीत.
गणेशोत्सवातील खर्च कमी व्हावा, वर्गणीची कोणावर सक्ती होऊ नये, लोकवर्गणीतून जमा झालेली रक्कम गावाच्या विधायक कामासाठी खर्च व्हावी, गाव म्हटले की गट-तट आले, यातून गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत मारामारी होऊ नये, पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी व्हावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, पोलीस ठाण्यापासून अनेक गावे २५ ते ३० किलोमीटरवर आहेत, एखादा अनुचित प्रकार घडला तर तिथे पोलिसांना पोहोचण्यास किमान अर्धा तास तरी लागतो. यासाठी पंधरा वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी पुढाकार घेऊन ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम सुरु केला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छताअभियान व महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरु झाल्यानंतर या उपक्रमाचा अनेक गावांनी स्वीकार केला. मात्र बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावे उपक्रमातून बाहेर पडली असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. गतवर्षी १४० गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ बसविला होता.
दुष्काळग्रस्तांकडे पाठ
जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. जमा झालेल्या वर्गणीतील निधी दुष्काळग्रस्तांना देण्याची विनंती करण्यात आली होती. पण याकडे अनेक मंडळांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येते. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंडळे पुढे आली असती, तर ‘एक गाव एक गणपती’ मोहीम राबविणाऱ्या गावांची संख्या वाढली असती.
योजनेची आकडेवारी...
वर्षगावांची संख्या
२००५ ७६
२००६ ८५
२००७ १४५
२००८ ३३४
२००९ २४५
२०१० ३०२
२०११ १९४
२०१२ २०५
२०१३ १५१
२०१४ १२४
२०१५ ११०
जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ व्हावा, यासाठी जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील ग्रामस्थांच्या बैठका घेऊन आवाहन केले होते. दुष्काळजन्य स्थिती असल्याने खर्च कमी करावा. गणेशोत्सवासाठी जमा झालेला पैसा दुष्काळग्रस्तांना देण्याऐवजी गावपातळीवर शेततळी कामासाठी वापरता आला असता.
- शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी
गावपातळीवर राजकारण व गट-तट बाजूला ठेवले, तर ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो. पण पोलीस व प्रशासनाकडून जनजागृती कमी पडत आहे. लोकवर्गणीचा वापर गावाच्या विधायक कामासाठी होऊ शकतो. बक्षीस मिळविण्यापुरते एकत्रित न येता सातत्य ठेवावे.
- अॅड. अमित शिंदे, सांगली जिल्हा सुधार समिती