चार किलो द्राक्षाचा केवळ किलोभर बेदाणा
By Admin | Updated: April 15, 2015 00:28 IST2015-04-15T00:28:13+5:302015-04-15T00:28:13+5:30
जत तालुक्यातील चित्र : प्रतिकूल हवामानाचा फटका; दर चांगला असूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

चार किलो द्राक्षाचा केवळ किलोभर बेदाणा
गजानन पाटील, संख : दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, सवळ पाणी, खते, तसेच पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत तालुक्यातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. बेदाणा उत्पादनात कमालीची घट झाली आहे. द्राक्षमण्यांत पुरेशा प्रमाणात साखर तयार झाली नसल्याने चार किलो द्राक्षांमध्ये केवळ एक किलो बेदाणा तयार होत आहे. बेदाण्याला सध्या बाजारात चांगला दर असूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.
अवकाळी पावसामुळे द्राक्षातील साखर कमी झाली. बेदाण्याचा प्रति एकरी उताराही कमी झाला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तालुक्यात द्राक्षबागांचे क्षेत्र ५०६० हेक्टर आहे. गतवर्षी पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा, तसेच टॅँकरद्वारे बागा जगविल्या आहेत. काही बागांना खोड जगविण्याएवढेही पाणी मिळाले नाही. परंतु शेतकऱ्यांनी बागा महत्प्रयासाने जगवून फळ आणले आहे, पण प्रतिकूल हवामानामुळे प्रारंभापासूनच दावण्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. औषधावर मोठा खर्च झाला होता. पाण्याच्या कमतरतेमुळे काड्या मध्यम प्रमाणात तयार झाल्या. पाण्याअभावी खताची मात्रा कमी पडल्यामुळे फळ मोठे होण्यास, मण्यांचा आकार वाढण्यास, मणी फुगण्यास अनुकूल स्थिती लाभली नाही. त्यामुळे द्राक्षघड आणि मणी लहान तयार झाले.
सेंद्रीय, रासायनिक खते देऊनही द्राक्षवेलींची वाढ पुरेशी झाली नाही. झाडावर पानांची संख्या कमी असल्याने घडांची वाढ झाली नाही. द्राक्षघडांमध्ये फोलपटे तयार झाली आहेत. यावर्षी मण्यांमध्ये साखरेचे प्रमाण कमी उतरले. सवळ पाण्यामुळेही साखरेचे प्रमाण कमी भरले. बागांना चार महिने पूर्ण होऊनही द्राक्षमण्यात फक्त २२ टक्के एवढीच साखर आली होती. विहीर, कूपनलिकेतील पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण नऊ टक्के आहे. त्यामुळेही साखर पुरेशा प्रमाणात भरत नाही.
द्राक्षमण्यांचा आकार लहान झाल्यामुळे चांगल्या दर्जाचा बेदाणा तयार झाला नाही. तसेच अवकाळी पावसामुळे काढणीसाठी परिपक्व झालेल्या द्राक्षात आलेली साखर कमी झाली, बेदाणा चपटा झाला.
फोलपटाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने पिवळा, हिरवा, वजनदार, गरयुक्त चकाकी बेदाणा कमी झाला. वजनातही कमालीची घट झाली. बेदाण्याचा उतारा एकरी दोन टनाऐवजी अर्ध्या टनापेक्षाही कमी झाला आहे. द्राक्षाला बाजारात म्हणावा तसा भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी बेदाण्याकडे वळला आहे. चांगल्या प्रतीच्या बेदाण्यासाठी डिपिंग, स्प्रे देणे यासारखे प्रकार करून मणी फुगविला जातो. हिरवा व पिवळा बेदाणा तयार करण्यात येतो. सोडियम कार्बोनेट वापरून १२-१३ दिवसात बेदाणा तयार होतो. पिवळ्या बेदाण्यापेक्षा हिरव्या बेदाण्यास जास्त भाव मिळतो. सध्या बाजारात १५० ते २२० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. परंतु प्रतिकूल हवामानामुळे काळ्या, डागी बेदाण्याचे प्रमाण जादा आहे. साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे बेदाण्याची फोलपटे तयार झाली आहेत.