इस्लामपुरात भय उरले फक्त लॉकडाऊनचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:45+5:302021-02-23T04:41:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि परिसरातील प्राथमिक शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, शासकीय कार्यालये, आठवडी बाजार, भाजी ...

इस्लामपुरात भय उरले फक्त लॉकडाऊनचे
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि परिसरातील प्राथमिक शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, शासकीय कार्यालये, आठवडी बाजार, भाजी मंडई, एसटी बसेसमध्ये दररोज तोबा गर्दी होत आहे. ती कोरोना संसर्गाला आमंत्रण देत आहे. नागरिकांना आता कोरोनापेक्षा लॉकडाऊनचीच भीती अधिक वाटत आहे.
मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत कोरोनाचा कहर वाढत असल्याने काही शहरांत लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात मात्र नवीन रुग्णांची संख्या कमी असल्याने सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत; परंतु गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंधने घातली आहेत. याचे इस्लामपूर शहरातील नागरिकांना काही देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. चौका-चौकांत होणारी गर्दी, विनामास्क फिरणारे दुचाकी वाहनधारक, आठवडी बाजार आणि सकाळच्या भाजी मंडईतील गर्दी यावर कोणाचेच नियंत्रण नाही. शहर वाहतूक पोलीस चौकाचौकांतून असले तरी त्यांच्यासमोरच विनामास्क जाणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे.
सध्या शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन शिक्षण सुरू असल्याने या परिसरात होणाऱ्या गर्दीवर शाळा व्यवस्थापनाचे नियंत्रण नाही. शाळेमधून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. महाविद्यालयीन परिसरात बहुतांशी विद्यार्थी मास्क वापरताना दिसत नाहीत.