तासगाव निवडणुकीनंतरच जिल्हा बँकेची मोर्चेबांधणी

By Admin | Updated: April 3, 2015 00:36 IST2015-04-02T23:45:36+5:302015-04-03T00:36:13+5:30

राष्ट्रवादीकडून संकेत : सर्वपक्षीय एकत्रिकरणाच्या हालचाली

Only after the Tasgaon elections, the district bank's frontline bandh | तासगाव निवडणुकीनंतरच जिल्हा बँकेची मोर्चेबांधणी

तासगाव निवडणुकीनंतरच जिल्हा बँकेची मोर्चेबांधणी

सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान होत आहे. या मतदानाच्या प्रक्रियेनंतरच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जाईल, अशी माहिती आज, गुरुवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिली. दरम्यान, सर्वपक्षीय एकत्रिकरणास काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आता भाजपचे खासदार संजय पाटील यांनीही हिरवा कंदील दर्शविल्याने त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या ४ एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ८ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ११ ते २४ एप्रिल या कालावधित अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सध्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरू असल्याने, त्याचे मतदान झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. १२ किंवा १३ एप्रिल रोजी राष्ट्रवादीची जिल्हा बँकेसंदर्भात निवडणूक होणार आहे. या बैठकीतच निवडणुकीबाबतचे धोरण निश्चित केले जाईल. सर्वपक्षीय नेत्यांना आवाहनही करण्यात येण्याची चिन्हे आहेत. तोपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी केले आहे. त्यानुसार येत्या ४ एप्रिलपासून अर्ज दाखल केले जाणार आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी पक्ष बाजूला ठेवून नेत्यांनी एकत्रित यावे, असे आवाहन राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी यापूर्वीच या आवाहनास प्रतिसाद दिला होता. भाजपचे खासदार संजय पाटील यांनीही गुरुवारी पत्रकारांशी बोलताना याबाबतची भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी बँक चांगल्या, प्रामाणिक लोकांच्या हाती जाणार असेल, तर आमची हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्वपक्षीय नेते एकत्रित येण्याची शक्यता बळावली आहे. उमेदवारीवरून मतभेद निर्माण झाले नाहीत, तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तालुकानिहाय मतदारसंख्येचा विचार केल्यास सर्वाधिक मतदार वाळवा आणि मिरज तालुक्यातच आहेत. त्यामुळे याठिकाणची मतेच निर्णायक ठरणार आहेत. (प्रतिनिधी)


शेतकरी पॅनेल होणार
आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकरी पॅनेल स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पॅनेलअंतर्गतच सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित येण्याचे आवाहन होणार असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा तासगाव-कवठेमहांकाळच्या निवडणुकीनंतर होण्याची शक्यता आहे.

प्रामाणिक, स्वच्छ चारित्र्याचे लोक जिल्हा बँकेत आले पाहिजेत. त्यांना या क्षेत्राचा अभ्यास असावा. असे लोक देण्याबद्दल एकमत होत असेल, तर आम्ही एकत्र येण्यास तयार आहोत. ही बँक शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाची असल्याने यामध्ये राजकारण नसावे.
- संजय पाटील, खासदार

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाचे केंद्र नव्हे. त्यामुळे तसा विचार या निवडणुकीत केला जाऊ नये. प्रामाणिक व अभ्यासू लोक याठिकाणी यावेत. या सर्व गोष्टींसह आम्ही पक्षीय बैठकीत आमची मते मांडणार आहोत.
- पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Only after the Tasgaon elections, the district bank's frontline bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.