सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात केवळ ६९२ जणांना कोरोनाची लस टोचण्यात आली. त्यामुळे उरलासुरला साठाही संपुष्टात आल्यामुळे लसीकरण बंद झाले. जिल्हा प्रशासनाने शासनाकडे दोन लाख डोस मागितले आहेत, ते येण्यास चार-पाच दिवस लागण्याची शक्यता असून, त्यानंतरच मोहीम सुरु होईल.
ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये गुरुवारीच लस संपली होती. प्राथमिक आरोग्य केेंद्रांमध्ये शुक्रवारी दिवसभरात फक्त नऊजणांना लस टोचणे शक्य झाले. ग्रामीण आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयांत १६८ जणांचे लसीकरण झाले. महापालिका क्षेत्रात आरोग्यवर्धिनी केंद्रांत मात्र ५१५ जणांना लस देण्यात आली. दरम्यान, काही खासगी रुग्णालयात अद्याप लसीचे काही डोस शिल्लक आहेत, तेथे २५० रुपये शुल्कासह लसीकरण करुन घेता येईल. मात्र, तेथील डोसची संख्याही अत्यल्प आहे.
शुक्रवारी लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ४५ वर्षांवरील लाभार्थी आले होते, परंतु लस संपल्याने त्यांना परतावे लागले. आता नवा साठा आल्यानंतरच त्यांचे लसीकरण होईल. दुसरा डोस लांबला तरी कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
शुक्रवारी फक्त ६९२ जणांना लस
ग्रामीण भागात - फक्त ९
निमशहरी भागात - १६८
महापालिका क्षेत्रात - ५१५
जिल्ह्यात एकूण - ६९२