इस्लामपूर मतदारसंघात अवघी ४६ गाव

By Admin | Updated: September 16, 2014 23:18 IST2014-09-16T22:58:19+5:302014-09-16T23:18:44+5:30

इस्लामपूरची विभागणी दोन गटात : आठवेळा साखराळेत आमदारकीे

Only 46 villages in Islampur constituency | इस्लामपूर मतदारसंघात अवघी ४६ गाव

इस्लामपूर मतदारसंघात अवघी ४६ गाव

युनूस शेख- इस्लामपूर -कृष्णा आणि वारणा नदीच्या सुपीक पट्ट्यातील वसलेला सधन आणि क्रांतिकारकांचा तालुका म्हणून वाळव्याची ओळख आहे. पूर्वीचा वाळवा विधानसभा मतदारसंघ हा २००९ च्या पुनर्रचनेनंतर इस्लामपूर या नावाने पुढे आला. पुनर्रचनेनंतर वाळवा तालुक्यातील ३८ आणि मिरज तालुक्यातील आठ गावे अशा एकूण ४६ गावांचा समावेश असणारा आणि वाळवा-मिरज अशा दोन तालुक्यात इस्लामपूर मतदारसंघाची विभागणी झाली आहे.
विशेष म्हणजे पुनर्रचनेत वाळवा तालुक्यातील ५२ गावे पश्चिमेकडील शिराळा मतदारसंघात गेली आहेत. त्यामुळे तालुक्याची विभागणी इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात झाली आहे. १९६२ पासूनच्या निवडणुकीत राजारामबापू पाटील तीनदा व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील पाचवेळा यांच्या रूपाने साखराळे गावाच्या नावावर आठवेळा आमदारकीची मोहोर उठली, तर विलासराव शिंदे (आष्टा, १९७८) विश्वासराव पाटील (शिगाव १९८0) आणि क्रांतिवीर पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी (वाळवा १९८५) यांनी प्रत्येकी एक वेळ आमदारकी पटकावली.
१९७८ च्या निवडणुकीत बापू जनता पक्षातर्फे ‘नांगरधारी शेतकरी’ या चिन्हावर उभे होते. याचवेळी त्यांचेच कार्यकर्ते असणाऱ्या आष्ट्याच्या विलासराव शिंदे यांना काँग्रेसच्या ‘गाय-वासरू’ या चिन्हावर उतरवले गेले; तर डाव्या आघाडीतर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील अशी तिहेरी लढत झाली. या निवडणुकीत वसंतदादांनी विलासराव शिंदे यांना ताकद देत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतील प्रबळ दावेदार राजारामबापू पाटील यांचा पराभव करून खळबळ उडवून दिली होती. पुन्हा १९८० च्या निवडणुकीत जनता पक्षातर्फे शिगावचे विश्वासराव पाटील आणि काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते व प्रदेशाध्यक्ष गुलाबराव पाटील यांचा सामना झाला. या निवडणुकीतही पुन्हा वसंतदादांनी आपला करिष्मा दाखवत गुलाबराव पाटील यांना गारद केले. त्यानंतर १९८५ च्या निवडणुकीत क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी आणि विलासराव शिंदे यांच्या लढतीवेळीही वसंतदादांनी आपली सिंहाची काठी दाखवत आपल्या मतदारांना नागनाथअण्णा यांच्या निवडणुकीतील ‘सिंह’ या चिन्हाकडे वळवून राजकारणात पात बदलायची नाही, असा सूचक इशारा विलासराव शिंदे यांना देत, त्यांचा पराभव घडवून आणला. त्यानंतर १९९० मध्ये पहिली निवडणूक लढवणाऱ्या जयंत पाटील यांनी विलासराव शिंदे यांचा पराभव करीत बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली.


राजकारणातील त्यांची ही बेरीज २००९ च्या पाचव्या निवडणुकीपर्यंत सुरूच राहिली. पण जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात स्वाभिमानीच्या खासदार राजू शेट्टी यांनी दोनवेळा मुसंडी मारत इतिहास घडवला. साडेतीन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर खा. शेट्टी यांनी जयंतरावांच्या तोंडचे पाणी पळविले होते. विधानसभेसाठी जयंत पाटील यांचा असणारा हा सर्व मतदार शेट्टींच्या पाठीशी उभा राहिला, हे कटू वास्तव ताजे असतानाच, आता विधानसभेचा फड रंगणार आहे.

वाळवा तालुक्यात वसंतदादा पाटील यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्याची प्रचिती तीन निवडणुकांमधील दादांच्या इशाऱ्यावरून आली. अजूनही ही धग राखेच्या कोंदणात गाडून घेतलेल्या निखाऱ्यात आहे, याचे प्रत्यंतर अपवादाने येते.
जयंत पाटील यांनी विलासराव शिंदे, अशोकदादा पाटील, इस्लामपूरच्या नगरपालिका राजकारणातील कट्टर विरोधक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील यांनाही बरोबर घेत बेरजेचे राजकारण केले आहे.

Web Title: Only 46 villages in Islampur constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.