जुलैची एलबीटी वसुली केवळ १३ कोटी
By Admin | Updated: August 2, 2015 00:12 IST2015-08-02T00:11:07+5:302015-08-02T00:12:04+5:30
महापालिका : पंधरा दिवसानंतर कारवाईसाठी तयारी, थकित कराचा डोंगर प्रशासनासाठी डोकेदुखी

जुलैची एलबीटी वसुली केवळ १३ कोटी
सांगली : महापालिकेच्या एलबीटी विभागाचे वसुलीचे दुखणे कायम असून, जुलै महिन्यात मोठ्या वसुलीची अपेक्षा ठेवलेल्या महापालिकेच्या पदरी पुन्हा निराशा आली. जुलै महिन्याची वसुली केवळ १३ कोटी ६९ लाख ११ हजार ३१८ इतकीच झाली आहे. थकबाकीसहीत महापालिकेला आणखी १२५ कोटी रुपये वसुली अपेक्षित असताना चालू वर्षाची जुलैअखेर वसुली ३२ कोटींवर गेली आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील एलबीटी विभागाला मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन दिवसांत चांगली वसुली झाली असली तरी, एकूण वसुलीत महापालिकेच्या पदरी निराशा आली आहे. महापालिका क्षेत्रातील एलबीटी जुलैपासून शासनाने रद्द केली आहे. येत्या पंधरा दिवसांत वसुलीची संधी महापालिकेला आहे. त्यानंतर एलबीटी वसुलीसाठी महापालिकेच्या हाती फारसे काही राहणार नाही. जुलै महिन्यात मोठी वसुली होईल, अशी अपेक्षा महपाालिकेने बाळगली होती, मात्र केवळ साडेतेरा कोटींचा आकडाच महापालिका ओलांडू शकली. जुलै महिन्यात नव्या केवळ १९२ व्यापाऱ्यांनी एलबीटीचा भरणा केला आहे. वास्तविक हा आकडा हजारोंच्या घरात अपेक्षित होता.
गेल्या तीन दिवसांत महापालिकेने चांगली वसुली केली असली तरी, थकबाकी व चालू मागणीचा विचार करता तीही वसुली कमीच आहे. एलबीटी बुडविणाऱ्या व अभय योजनेत समावेश नसलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. राज्य शासनानेच अभय योजनेच्या अधिसूचनेतच एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायद्याने कारवाई करण्याची मुभा महापालिकेला दिली आहे. दुकानांची तपासणी, कागदपत्रांची छाननी, जप्तीच्या कारवाईचे अधिकार महापालिकेला आहेत. त्यामुळे त्याचीही तयारी आता प्रशासनाच्या स्तरावर सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांना कर भरण्यासाठी त्यांनी शेवटचे आवाहन केले आहे. त्यानंतर कारवाईस सुरुवात होणार आहे.
महापालिकेने शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्याचे पैसे केव्हा मिळणार याकडे आता प्रशासनाचे आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)