शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथीचे ऑनलाईन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:56+5:302021-09-02T04:57:56+5:30
सांगली : जैन धर्मीयांचे प्रथमाचार्य १०८ शांतिसागर महाराज यांचा ६६ वा पुण्यतिथी महोत्सव कोथळी-कुपनवाडी (जि. बेळगाव) येथे बुधवार, ८ ...

शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथीचे ऑनलाईन कार्यक्रम
सांगली : जैन धर्मीयांचे प्रथमाचार्य १०८ शांतिसागर महाराज यांचा ६६ वा पुण्यतिथी महोत्सव कोथळी-कुपनवाडी (जि. बेळगाव) येथे बुधवार, ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे सोशल मीडियावर ऑनलाईन प्रक्षेपण होणार असल्याची माहिती वीर सेवा दलाचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी दिली.
विसाव्या शतकातील प्रथमाचार्य चारित्र्य चक्रवर्ती समाधीसम्राट शांतिसागर महाराज यांच्या स्मृती चिंतन, अभिवादन, त्यांना अभिप्रेत चरित्र-चारित्र्य, संस्कार, अहिंसा - त्याग या विचारांचे समाजमनात अभिसरण व्हावे, त्यांच्या आदेश-उपदेशाचा प्रचार, प्रसार व्हावा, या उद्देशाने दरवर्षी पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन वीर सेवा दलाच्या वतीने होत आहे. यंदा कोरोनामुळे ऑनलाईन महोत्सव होणार असून, कोथळी-कुपनवाडी येथे सकाळी ६.४५ वाजता दीपप्रज्वलन, णमोकार महामंत्र जाप, विश्वशांती प्रार्थना, अंतिम आदेश उपदेशाचे वाचन, पंचामृत अभिषेक, प्रतिमापूजन, अर्घ्य समर्पण आदी कार्यक्रम होतील.
आचार्य वर्धमानसागर महाराज व स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी यांच्या सान्निध्यात व दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत हा महोत्सव होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध असल्याने गावामध्ये स्थानिक पातळीवर पुण्यतिथी साजरी करावी, असे आवाहन राजोबा यांनी केले.