ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांच्या खिशाला भुर्दंड, मोबाईल, नेट पॅकचा खर्च वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:07+5:302021-07-05T04:17:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना व लॉकडाऊनने शिक्षणासाठी मोबाईल अपरिहार्य केला आहे. ऑनलाईन शिक्षणाचे फायदे कमी आणि तोटेच ...

Online education has increased the cost of parents' mobiles, mobiles and net packs | ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांच्या खिशाला भुर्दंड, मोबाईल, नेट पॅकचा खर्च वाढला

ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांच्या खिशाला भुर्दंड, मोबाईल, नेट पॅकचा खर्च वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना व लॉकडाऊनने शिक्षणासाठी मोबाईल अपरिहार्य केला आहे. ऑनलाईन शिक्षणाचे फायदे कमी आणि तोटेच जास्त असल्याचा अनुभव पालक घेत आहेत.

ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्ताने मुले दिवस-दिवसभर मोबाईलमध्ये डोके खुपसून बसत आहेत. पालकांचा खर्चही वाढला आहे. विशेषत: एखाद्या कुटुंबात एकापेक्षा अधिक मुले असतील तर प्रत्येकासाठी वेगळा स्मार्टफोन आवश्यक ठरला आहे. प्रत्येकाचे रिचार्जही स्वतंत्र आहेत. स्वतंत्र स्मार्टफोन घेणे शक्य नसणारे पालक स्वत:चा फोन अभ्यासासाठी देतात, पण ते कामावरुन घरी येतात, तेव्हाच मुलांना ताबा मिळतो. या स्थितीत मुलांना गरजेच्या वेळेत अभ्यासासाठी फोन मिळत नाही. मुलांच्या फोनसाठी रिचार्जसोबतच त्याच्या देखभाल-दुरुस्तीचाही स्वतंत्र बोजा पालकांना सोसावा लागत आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त मुलांकडे स्वत:चा स्मार्टफोन नसल्याचे खुद्द अधिकारीच खासगीत कबूल करतात. यामुळे मुले हक्काच्या शिक्षणापासून अप्रत्यक्षरित्या वंचित राहत आहेत. काही पालकांनी मोबाईलऐवजी लॅपटॉपचा पर्याय शोधला आहे, पण त्यासाठी स्वतंत्र इंटरनेट कनेक्शन गरजेचे ठरले आहे. शिक्षण मोबाईलवर सुरु असले तरी शाळांचे शुल्क मात्र थांबलेले नाही. त्यामुळे पालकांना दुहेरी खर्चाचा सामना करावा लागत आहे.

बॉक्स

- ज्या पालकांकडे स्मार्टफोन आहे, त्यातील बहुतांश कामावर असतात. त्यामुळे अभ्यासाच्या वेळेत मुलांना मोबाईल उपलब्ध होत नाही. पालकांना दीक्षा ॲप किंवा इतर माध्यमांची माहिती नाही. शाळा बंद, शिक्षण सुरु, स्वाध्याय अशा माध्यमांची माहिती नसल्याने विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहतात.

- ग्रामीण भागात इंटरनेट सेवेची प्रमुख समस्या आहे. इंटरनेटची गती अत्यंत कमी असते. वीज पुरवठा खंडित होतो, तेव्हा मोबाईल मनोरे बंद पडण्याचे प्रकार सर्रास घडतात. नेटसाठी छतावर किंवा माळावर जाऊन बसावे लागते. ऑनलाईन अभ्यासावेळी मोबाईलची बॅटरी वेगाने खर्ची पडते, त्यानंतर चार्जिंगसाठी भारनियमनाचा अडसर येतो.

कोट

दोन्ही मुले माध्यमिक शाळेत शिकतात. दोघांचा ऑनलाईन अभ्यास एकाच वेळेत असतो, त्यामुळे दोन स्मार्टफोन घ्यावे लागले. दोघांसाठी स्वतंत्र रिचार्ज पॅक मारावे लागले आहेत. हा खर्च झेपणारा नाही. अभ्यास संपल्यानंतरही मुले मोबाईलमधून बाहेर पडत नाहीत. त्यांच्यावर २४ तास लक्ष ठेवणे शक्य नाही.

- योगेश चव्हाण, पालक, मिरज

मुलासाठी स्वतंत्र मोबाईल घेतला आहे. ऑनलाईनवरुन अभ्यास सुरु असला तरी तो परिपूर्ण नाही. शिक्षकांशी समोरासमोर संवाद साधता येत नसल्याने अभ्यासात त्रुटी राहतात. गणित, इंग्रजी, शास्त्र अशा विषयांसाठी आम्हालाच लक्ष घालावे लागते. खासगी क्लासेस बंद असल्यानेही विषयांचे ज्ञान पक्के होत नाही.

- अलकनंदा लोणारी, पालक, सांगली

मोबाईलच्या फायद्यासोबतच तोटेदेखील

ऑनलाईन अभ्यासाच्या फायद्यांसोबतच अनेक दुष्परिणाही पुढे येत आहेत. समाजमाध्यमांच्या बाबतीत मुले वयाच्या तुलनेत नको इतकी पुढे गेली आहेत. लॉकडाऊन व ऑनलाईन अभ्यासामुळे ती घरकोंबडी झाली आहेत. शारीरिक व्यायाम थांबले आहेत. मुलांची वजने वाढताहेत. या स्थितीत पालकांनी अधिक लक्ष देण्याची वेळ आली आहे. योगासने, वाचन, घरगुती खेळांकडे वळवले पाहिजे.

- अर्चना मुळे, समुपदेशक

पॉईंटर्स

जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली ३९,५२६, दुसरी ४२,६२७, तिसरी ४३,६५८, चौथी ४३,६१५, पाचवी ४४,४८३, सहावी ४३,५३६, सातवी ४३,६०२, आठवी ४४,०९५, नववी ४५,२७२, दहावी ४२,१७६

Web Title: Online education has increased the cost of parents' mobiles, mobiles and net packs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.